चित्रपटसृष्टीमध्ये कधी कोणता कलाकार प्रकाशझोतात येईल हे सांगता येणं कठीण आहे. असंच काहीसं एका गायकासोबत झालं. तो आला, त्याने रॅप केलं आणि त्याने जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे त्या गायक-रॅपरच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से सर्वांच्या भेटीला येणार असल्याची चिन्हं आहेत. इथे चर्चा सुरु आहे गायक- रॅपर हनी सिंग याची.

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले जाणार आहे. या पुस्तकात त्याची जीवगाथा लिहिली जाणार असून, त्यावर बेतलेल्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठीचे अधिकार देण्यासाठी त्याला २५ कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. ‘लुंगी डान्स’, ‘पार्टी विथ द भूतनाथ’ या गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हनीच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा आजवर विविध माध्यमांतून करण्यात आला आहे. पण, त्यातही काही असे प्रसंग आहेत जे कोणासमोरही उघड झालेले नाहीत. हनीच्या कारकिर्दीत अडचणीच्या वेळी तो नेमका कुठे होता, या परिस्थितीमध्ये त्याला कोणी साथ दिली, अशी बरीच माहिती या पुस्तकात असेल. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील हे सर्व देर्शविण्यात येईल.

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…

विविध गाण्यांना आपल्या हटके शैलीत रॅप करणारा हनी अचानक चित्रपटसृष्टीत दिसेनासा झाला होता. त्यावेळी तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. इतकच काय, तर सोशल मीडियावर त्याचा एक जखमी अवस्थेतील फोटोही व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्याचा अपघात झाल्याचंही म्हटलं जात होतं. पण, यानंतर हनीविषयीची खरी माहिती समोर आली. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून इतके महिने दूर असलेला हनी एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. बायपोलर डिसऑर्डर नावाच्या आजाराने ग्रासला होता. या अठरा महिन्यांमध्ये त्याच्यावर चार डॉक्टरांचे उपचार सुरु होते अशी माहितीही त्याने दिली होती.