गोरेगावच्या आरे वसाहतीतील नियोजित मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने रात्री काही तासांमध्येच तेथील वृक्षांची कत्तल सुरू केली. शनिवारपर्यंत हजारो वृक्ष तोडले गेल्यामुळे त्याचे पडसाद दिवसभर सगळीकडेच उमटले. सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला. अभिनेत्री सई ताम्हणकरने ट्विटरच्या माध्यमातून आरेतील वृक्षकत्तलीवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला.

”कापा. सगळी झाडं कापा. नंतर बसा बोंबलत. जेवढी झाडं कापतायत तेवढीच परंत लावणार का,” असा सवाल तिने प्रशासनाला विचारला आहे. वृक्षतोडीच्या कारवाईमुळे पर्यावरणवादीच नाही तर सामान्य नागरिकांमध्येही संताप उमटत आहे. जितक्या तत्परतेने झाडे तोडली तेवढ्याच तातडीने वृक्षारोपण करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

आणखी वाचा: चित्रपटांमध्ये ‘छोटा अमिताभ’ साकारणाऱ्या या मुलाची बहीण आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’विरुद्ध सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला. संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये केवळ पर्यावरणप्रेमीच नाहीत तर रोजच्या जगण्याशी झगडणारे, रस्त्यांवरील खड्ड्यांतून गचके खात प्रवास करणारे सामान्य नागरिकही आहेत.