सेलिब्रिटींना आपण पडद्यासमोर बघतो, त्यांच्या कामाने प्रभावित होतो. पण खऱ्या आयुष्यात ते कसे आहेत, पडद्यामागील काय गोष्टी आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात असेच काही सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि त्यांच्याशी गप्पांमधून बऱ्याच गोष्टी उलगडत जातात. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे आणि राज्य नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली होती. यावेळी सयाजी शिंदे यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल काही गोष्टी सांगितल्या.
रजनीकांत यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा सयाजी यांनी सांगितला. ‘मी पहिल्यांदा रजनीकांत यांना एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटलो. शूटिंग सुरू होण्यापूर्वी सेटवरच केस कापण्यासाठी लवकर गेलो होतो. केस कापणाऱ्याच्या हातावर रजनीकांत हे नाव गोंदवलेलं पाहिलं. चाहत्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम तेव्हा मला लक्षात आलं. त्यानंतर सेटवर पोहोचल्यावर ते स्वत: उभं राहून मला भेटायला आले आणि बोलू लागले. ते मराठीत बोलत आहेत की तामिळमध्ये हे मला क्षणभर कळलंच नाही. कारण ती आमची पहिलीच भेट होती. तुम्ही काय बोललात हे मला समजलं नाही असं म्हटल्यावर त्यांनी मराठी स्पष्टपणे बोलता येत नसल्याचं सांगितलं. त्यांना भेटून मला खूप आनंद झाल्याचं सांगितलं. त्यावर ते मला म्हणाले की, सयाजी इथे स्टार होण्यासाठी माझं आयुष्य गेलं. तू एकाच चित्रपटात दमदार अभिनय केलंस आणि तामिळनाडूतील प्रेक्षकांच्या मनात घर केलंस. अशी आमची पहिली भेट झाली.’
वाचा : प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या मंडळावरच तुकाराम मुंढेंनी केली होती कारवाई
रजनीकांत मुंबईत ‘काला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सयाजी यांच्या घरी गेले होते. त्याबद्दल सयाजी यांनी सांगितलं की, ”काला’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते मुंबईत आले होते. मुंबईत कधी आलात तर माझ्या घरी या असं त्यांना मी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्र्यांपासून बड्या लोकांचे आमंत्रण असल्याने तुझ्याकडे येणं जमणार नाही असं ते म्हणाले होते. दोन- तीन दिवसांच्या शूटिंगनंतर ते अचानक म्हणाले की, चला घरी जाऊयात का? हे ऐकून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मी लगेच पत्नीला फोन करून कळवलं आणि माझ्या परीने त्यांच्या आदरातीथ्यसाठी सर्वकाही केलं.’
रजनीकांत त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची काळजी करतात, विचारपूस करतात असंही त्यांनी सांगितलं. ‘म्हणूनच अशी लोकं जेव्हा घरी येतात तेव्हा साक्षात देवच घरी आल्यासारखं वाटतं,’ अशी भावना सयाजी यांनी व्यक्त केली.