नवीन वर्षाच्या सुरुवातीस प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये अभिनेता सैफ अली खानचा ‘कालाकांडी’ हा चित्रपटसुद्धा आहे. पण सैफला ‘कालाकांडी’पेक्षाही त्याच्या मुलीच्या पहिल्या चित्रपटाची जास्त चिंता असल्याचे दिसत आहे. सैफची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून डिसेंबरमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे करिना कपूरचाही ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कालाकांडी’च्या प्रमोशनवेळी प्रसारमाधम्यांशी संवाद साधत असताना करिनाच्या कमबॅकबद्दल प्रश्न विचारले असता सैफच्या रागाचा पाराच चढला.

करिनाच्या कमबॅकविषयी काय सांगशील असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तर ‘कमबॅक’ या शब्दावरच त्याने आक्षेप घेतला. ‘तुम्ही तिला हा प्रश्न विचारला का? तिने तुम्हाला चप्पल वगैरे फेकून मारली असती. तिच्या मते, ती नेहमीच या इंडस्ट्रीत सक्रीय राहिली आहे,’ असे तो म्हणाला. डिसेंबर २०१६ मध्ये तैमुरच्या जन्मानंतरचा करिनाचा पहिला चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वाचा : तैमुरचे टोपणनाव तुम्हाला माहितीये?

यावेळी फिटनेस आणि कामासाठी ती घेत असलेल्या मेहनतीचेही सैफने कौतुक केले. त्याचप्रमाणे मुलगी साराच्या पहिल्या चित्रपटाविषयी चिंताही व्यक्त केली. ‘मला माझ्याच करिअरचा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्यासारखे वाटत आहे. अभिनेत्री होणे तिचे स्वप्न आहे आणि तिची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत अशीच मी अपेक्षा करतो,’ असे सैफ म्हणाला.