टीव्ही स्टार सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे, वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थचे निघून जाणे, हे सर्वांसाठी काळजाला चटका लावून जाणारे आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे क्रिकेटविश्वालाही धक्का बसला आहे. सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी ट्वीट करून कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे. सिद्धार्थ हा केवळ एक हुशार अभिनेता नव्हता, तर त्याला खेळामध्येही रस होता. जेव्हा भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमदार कामगिरी केली, तेव्हा त्याने ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला होता. एवढेच नव्हे, तर सिद्धार्थने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल ट्वीट करून प्रतिक्रिया देखील दिली होती. या सगळ्याशिवाय सिद्धार्थला क्रिकेटबद्दल विशेष प्रेम होते.

महेंद्रसिंह धोनी हा सिद्धार्थचा आवडता क्रिकेटपटू होता. धोनीने गेल्या वर्षी २०२०मध्ये निवृत्ती घेतली, तेव्हा सिद्धार्थने ट्वीट करून एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला होता. आता सिद्धार्थच्या निघून गेल्यानंतर धोनीबद्दलचे त्याचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे.

हेही वाचा – सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर वीरेंद्र सेहवागचं ट्वीट होतंय व्हायरल; म्हणाला…

”बरेच खेळाडू आणि कर्णधार आहेत आणि असतील, पण धोनी फक्त एकच आहे. दुसरा कोणीही असू शकत नाही. तुम्ही नेहमीच संघाचे नेतृत्व केले आहे. तुम्ही नेहमीच संघ जिंकण्यासाठी खेळलात आणि भारतीय क्रिकेटला एक नवा आयाम दिला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच मिस केले जाईल. टीम इंडियामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल धोनी आणि रैना यांचे खूप आभार”, असे सिद्धार्थने ट्वीट केले होते.

 

सिद्धार्थ शेवटच्या वेळी ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ वेब सीरिजमध्ये दिसला होता, यात सिद्धार्थने त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. त्याने वरुण धवनच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटात काम केले, हा त्याचा पहिलाच चित्रपट होता.

सिद्धार्थचा प्रवास

१२ डिसेंबर १९८० रोजी सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.