– ‘ड्राय डे’ चित्रपटासाठी गायलं ड्युएट गाणं
– ८ सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांतली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचं सातत्यानं दिसू लागलं आहे. हा ट्रेण्ड आता वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वेगळ्या नावामुळे अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ‘ड्राय डे’ या चित्रपटासाठी जोनिता गांधी आणि अॅश किंग या मातब्बर गायकांनी ड्युएट गायलं आहे. या चित्रपटातून या दोघांनी मराठीत पदार्पण केलं आहे.

वाचा : वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिकासोबत रणवीरचा नव्या कारमधून फेरफटका

आनंद सागर प्रॉडक्शन्सच्या संजय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, ऑस्कर विजेत्या ए. आर. रहमान यांचे सहकारी असलेल्या अश्विन श्रीनिवासन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे अश्विन यांचाही मराठी चित्रपट संगीतातला प्रवास सुरू झाला आहे. जोनिता आणि अॅश यांनी जय अत्रे लिखित ‘गार गार कोळशात उठावी ही आग कशी’ हे ड्युएट गाणं गायलं आहे. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

वाचा : ‘मधुर भांडारकरांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस देणार’

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जोनिता गांधी हे मोठं नाव आहे. जोनितानं ‘ओके कन्मनी’ चित्रपटातलं मेंटल मनधिल, ‘दंगल’ चित्रपटातलं गिलहारियाँ, ‘हायवे’ चित्रपटातलं कहाँ हुँ मैं अशी.. गाजलेली गाणी गायली आहेत. तर अॅश किंगनं आएशा सुनो आएशा, ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातलं बारिश, ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातलं अलीझेह अशी गाणी गायली आहेत. या पार्श्वभूमीवर, आता ‘ड्राय डे’ चित्रपटातून हे दोघं मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठीतल्या पहिल्या ड्युएट गाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.