सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच नुकसानसुद्धा आहेत. एखादा फोटो किंवा पोस्टमुळे बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो आणि सेलिब्रिटींच्या बाबतीत ही गोष्ट अनेकदा घडते. अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा या ट्रोलिंगला वैतागून ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे.

‘काळी काळासाठी मी माझा ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे,’ असं ट्विट सोनमने शनिवारी केलं. काही दिवसांपूर्वीच सोनमने मुंबईच्या रस्त्यांबाबत एक पोस्ट लिहिली होती आणि या पोस्टवरूनच तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

‘मला शहरात पोहोचायला दोन तास लागले. अजूनही मी ट्रॅफिकमुळे पोहोचली नाही. रस्ते खराब आहेत आणि प्रदूषणसुद्धा वाढलं आहे. घरातून बाहेर पडणं म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे,’ अशी पोस्ट सोनमने लिहिली होती. त्यावर अनंत वासू नावाच्या एका युजरने प्रतिक्रिया दिली. ‘तुमच्यासारखे लोक सार्वजनिक वाहनांचा किंवा कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांचा वापर करत नाहीत. तुझ्या आलिशान गाड्या केवळ तीन ते चार किमी प्रतिलीटर मायलेज देतात हे तुला माहित आहे का? तुझ्या घरातील १०-१२ एसीसुद्धा जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वांत आधी तू तुझ्यापासून होणारं प्रदूषण कमी कर,’ असा सल्ला त्या युजरने दिला.

वाचा : दिवाळीला चाहत्यांसाठी कपिल शर्माची धमाकेदार भेट

अनंत वासूच्या या उत्तरामुळे सोनम चांगलीच भडकली. ‘तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात. कारण त्यांना छेडछाडीची भीती असते,’ असं प्रत्युत्तर सोनमने दिलं. सोशल मीडियावर सोनम आणि त्या युजरमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ‘तुझ्या या वक्तव्याविरोधात मी तुला कोर्टातही खेचू शकतो. कारण मला देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे,’ अशा शब्दांत अनंत वासूने सोनमला सुनावलं. त्याच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी सोनमला ट्रोल केलं. छेडछाड आणि सार्वजनिक वाहन वापरण्याचा काय संबंध असा सवाल नेटकऱ्यांनी सोनमला विचारला. तर अनेकांनी विनाकारण पुरुषांवर आरोप करत असल्याची टीका केली. याआधीही सोनम कपूर अनेकदा ट्रोल झाली आहे. काळवीट शिकारप्रकरणी तिने सलमान खानची पाठराखण करत ट्विट केलं होतं. त्यावेळीही नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून अखेर सोनमने ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.