वाढदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक असा दिवस असतो जो तितक्याच खास पद्धतीने साजरा करत त्याला अविस्मरणीय करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. श्रीदेवी यांच्या मुलीचा म्हणजेच जान्हवीचा यंदाचा वाढदिवसही खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला. वयोवृद्ध महिलांच्या साथीने जान्हवीने या खास दिवसाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुलल्याचंही पाहायला मिळालं.

वृद्धाश्रमात जान्हवीसाठी सर्वांनी शुभेच्छा देणारं गीत गात तिच्यासाठी केकही आणला होता. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिच्या आईला गमावलं. श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पण, या दु:खातून सावरण्यासाठी सध्या कपूर कुटुंबीय तिला मदत करत असून, जान्हवीसुद्धा खंबीरपणे या प्रसंगाला सामोरी जात आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कपूर कुटुंबातील मंडळींनी एक छोटंसं सेलिब्रेशन करत जान्हवीला सरप्राईज दिलं. अभिनेत्री सोनम कपूर, रिया कपूर, खुशी कपूर आणि संजय कपूरची मुलगी अशा सर्व बहिणींनी एकत्र येत जान्हवीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी अंशुला कपूरही या छोटेखानी पार्टीत सहभागी झाली होती.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

सोनम आणि रियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जान्हवीच्या बर्थडे बॅशचे फोटो पोस्ट केले. सोनमने जान्हवीला वाढदिवसाच्या खुप सुरेख शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. ‘आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वात धीट, कणखर मुलीला जी आज आयुष्याच्या एका नव्या वळणावर आहे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा..’, असं तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये लिहिलं होतं. ज्याच्या कमेंट बॉक्समध्ये जान्हवीने तिचे आभार मानले होते.