सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

“सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी चर्चा केली आहे” असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

आणखी वाचा- “….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: CBI कडे तपास सोपवण्याच्या निर्णयाचे भाजपाकडून स्वागत

भाजपाकडून निकालाचे स्वागत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशाचे भारतीय जनता पार्टीने स्वागत केले आहे. “सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणं ही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या पक्षपाती भूमिकेविरुद्ध एकाप्रकारे दाखवलेली नाराजी आहे” असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.

आणखी वाचा- “मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली..,” सुशांत प्रकरणी आशिष शेलार यांनी विचारले सहा प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.