‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रभास पहिल्यांदाच एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत यामध्ये भूमिका साकारत आहे. प्रभास मुख्य भूमिकेत असल्याने श्रद्धा कपूरच्या वाट्याला किती संधी मिळेल किंवा ती फक्त काही गाण्यांपुरतीच झळकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण श्रद्धाच्या भुमिकेमुळे ‘साहो’ची कथा वजनदार झाली, असे मत प्रभासने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मांडले.
‘याआधी मी बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रींसोबत काम केलेले नाही. पण या चित्रपटातील भुमिकेसाठी श्रद्धाची ही सर्वोत्तम निवड आहे. फक्त काही गाण्यांपुरती किंवा कमी वेळेसाठी तिची भूमिका नाही आहे. ती साकारत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे चित्रपटाच्या कथेलाही वजन प्राप्त झाले आहे. चित्रपटातील ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असेल. इतकेच नाही तर ती काही साहसदृष्ये करतानाही दिसेल,’ असे प्रभास म्हणाला.
The PadMan Song: भारताचा नवा चेहरा दाखवणारा ‘मॅडमॅन पॅडमॅन’
भुमिकेला न्याय देण्यासाठी श्रद्धाची कठोर मेहनत पाहून तोदेखील प्रभावित झाला आहे. ‘ती अत्यंत मेहनती आहे आणि विशेष म्हणजे ती जेव्हा सेटवर असते तेव्हा अगदी खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळते,’ असे त्याने सांगितले.
या चित्रपटातील काही साहसदृष्यांच्या चित्रीकरणासाठी श्रद्धा हैदराबादला रवाना झाली आहे. तर प्रभास सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून जानेवारी महिन्यात तो उर्वरित चित्रीकरणासाठी भारतात येणार आहे. ५ जानेवारीपासून दोघेही एकत्र काम करतील अशीही माहिती मिळत आहे.