निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. करणने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. मात्र, एका कारणासाठी आलियाची माफी मागायची असल्याचं करणने त्याच्या रेडिओवरील कार्यक्रमात स्पष्ट केलं.

करण सध्या ‘१०४.८ इश्क’ या रेडिओ चॅनलवरील त्याच्या कार्यक्रमातून लोकांना प्रेम, रिलेशनशीप यासंदर्भातील सल्ले देताना पाहायला मिळत आहे. याच कार्यक्रमात ‘रॅपिड फायर’दरम्यान श्रोते करणसंदर्भात प्रश्न विचारत असतात आणि त्याची उत्तरं तो देत असतो. अशाच एका प्रश्नाचं उत्तर देताना मला आलियाची माफी मागायची आहे, असं करण म्हणाला. ”स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटावेळी आलियाला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. ती सुरुवातीला थोडी लठ्ठ होती. पण आता ती एकदम फिट आहे. आलियाला वजन कमी करण्याचा सल्ला दिल्यानंतर ती फिटनेससाठी खूप मेहनत घेत आहे. दररोज ती जीममध्ये घाम गाळत आहे. या सगळ्यांसाठी मी जबाबदार आहे. हा सल्ला दिल्यानं तिला वाईट वाटलं असावं. त्यामुळे तिची माफी मागायची आहे, असं करणने सांगितलं.

वाचा : सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा आऊट?

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया लठ्ठ होती. पण लठ्ठपणावर मात करत तिने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. सर्वांत कमी वयात तिने बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले.