‘दंगल’नंतर बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ भूमिका साकारणार आहेत. एकीकडे आमिरसोबत भूमिका साकारण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतानाच एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला मात्र त्यात काही स्वारस्य नसल्याचं दिसतंय. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी आमिरची पहिली पसंती टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरला होती. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील भूमिकेसाठी मृणाल प्रसिद्ध आहे. मात्र मृणालने ही ऑफर नाकारल्याचं वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने दिलं आहे.

‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातही मृणालने भूमिका साकारली आहे. याच चित्रपटातील तिच्या अभिनयावर प्रभावित होऊन आमिरने तिला मेसेज करून ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी विचारले. इतकंच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राने तिला आणखी तीन चित्रपटांचीही ऑफर दिली होती. मात्र मृणालने या ऑफर्स नाकारल्या. ‘लव्ह सोनिया’ हा तिचा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या तीन चित्रपटांच्या ऑफरमुळे आपल्या इंटरनॅशनल करिअरला फटका बसेल, या विचाराने तिने आमिरची ऑफर नाकारल्याचे म्हटले जात आहे.

वाचा : जेव्हा अक्षयची मुलगी त्याची दाढी करते

मृणालने यापूर्वी सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठीही ऑडिशन दिलं होतं. मात्र काही कारणास्तव तिला ती भूमिका मिळाली नव्हती. मात्र ‘यशराज’च्या एका तरी चित्रपटात तिला घ्यायचे असे आदित्य चोप्राने तेव्हाच ठरवले होते. मृणालने नकार दिल्यानंतर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी फातिमा सना शेखला निवडण्यात आले आहे.