अक्षय कुमार… बॉलिवूडचा खिलाडी कुमार… अशी एक ना अनेक नावं असलेल्या या बॉलिवूडच्या हिट मशीनला नेहमीच मजा, मस्ती करताना पाहिले आहे. तो कधीच सार्वजनिक ठिकाणी ओरडताना किंवा चिडचिड करताना दिसत नाही. पण जेव्हा तो चिडतो तेव्हा मात्र त्याला पाहणं खरंच कठीण असतं. काही दिवसांपूर्वी एक चाहता त्याला स्पर्श करण्यासाठी अचानक त्याच्या समोर आला, त्याने केलेला तो स्पर्श अक्षयला फारसा आवडला नाही असेच वाटते. त्या चाहत्यावर अक्षय चांगलाच भडकला होता.

माझी नसबंदी निसर्गही करु शकत नाही- धर्मेंद्र

अक्षय आपली पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत एका कार्यक्रमामध्ये गेला होता. त्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर तो आपल्या गाडीच्या दिशेने जायला निघाला. त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी आधीच बाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी असते त्या गर्दीतून वाट काढत एक चाहता अक्षय कुमारपर्यंत पोहोचला. त्या चाहत्याने निळ्या रंगाचे शर्ट घातले होते. गाडी त्या कार्यक्रम ठिकाणाच्या दारापाशी आल्यानंतर अक्षयने आधी ट्विंकलला गाडीत बसू दिले. त्यानंतर तो गाडीत बसणार इतक्यातच त्या चाहत्याने अक्षयचा हात खेचला आणि हस्तांदोलन केले. प्रसांगवधान राखून अक्षयच्या अंगरक्षकाने त्या चाहत्याला दूर सारले.

अक्षयला त्या माणसाच्या या कृतीवर फार राग आला. व्हिडिओमध्ये तो त्या व्यक्तीला वेडा आहेस का असा प्रश्न विचारताना दिसतो. त्यानंतर अक्षय गाडीत बसून थेट तिथून निघून गेला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अक्षय लॉर्ड्स मैदानावर गेला होता. अक्षयने भारतीय संघाला प्रोत्साहन देताना नकळत तिरंगा उलटा पकडला होता. भारतीय महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अक्षयने हातात तिरंगा धरला होता. त्याने स्वतः तो फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता. मात्र, तिरंगा उलटा पकडल्याने लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता अक्षयने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली.