आपल्या सुमधूर आवाजाने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सदाबहार गायिका आशा भोसले यांचा दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. आशाताईंच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आले. जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाची दिल्ली येथे शाखा उभारण्यात आली असून, आशाजींचा हा पुतळा संग्रहालयाच्या बॉलिवूड संगीत विभागाची शोभा वाढवणार आहे.

पुतळा अनावरण करतानाचा लाइव्ह व्हि़डिओ आशाताईंच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर पुतळ्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी ट्विटसुद्धा केले आहे.

कलाकारांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेत मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये आजवर बऱ्याच कलाकारांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये बी- टाऊन कलाकारांची संख्या जास्त आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आशाजींचा अशा प्रकारचा हा पहिलाच पुतळा आहे.

BIG BOSS 11 : पहिल्याच दिवशी ‘अंगुरी भाभी’ला अश्रू अनावर

‘माझा बाळ’ (१९४३) या चित्रपटातून गायनाची सुरूवात करणाऱ्या आशाताईंनी शेकडो बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. राहुल देव बर्मन (आर.डी.बर्मन) यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ या गाण्यांसोबतच ‘जवानी दिवानी’तली गाणीही आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली.