चंदीगढ बलात्कार प्रकरणी अभिनेत्री भाजप खासदार किरण खेर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार पीडितेला त्यांनी एक सल्लाही दिला. पण, हा सल्ला दिल्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा रोष ओढावल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्षात आधीपासूनच तीन व्यक्ती बसलेले असताना तिने त्यात जाणेच चुकीचे होते, असे त्या म्हणाल्या.

उत्तर भारतात छेडछाडीच्या घटना सर्रास घडतात, त्यातही बलात्कारांविषयी सांगावे तर, हल्लीतर घरांमध्येही ही दुष्कृत्ये होतात. सामूहिक बलात्काराकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण, पीडित मुलीविषयी वक्तव्य करताना त्यांनी वेगळाच सल्ला दिला. ‘त्या मुलीनेच रिक्षात बसण्यापूर्वी ही काळजी घ्यायला हवी होती. कारण, त्यात आधीपासूनच तीन माणसं बसलेली होती. मी हे सर्व मुलींच्याच सुरक्षिततेसाठी सांगतेय. मुंबईत आम्ही कधी टॅक्सीने प्रवास करायचो, तेव्हाही आम्हाला सोडायला येणाऱ्या व्यक्तीला त्या वाहन चालकाचा दुरध्वनी क्रमांक, वाहन क्रमांक या गोष्टी लिहून द्यायचो. कारण, आम्हाला सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची होती. मला वाटतंय की या सर्व गोष्टींच्या दृष्टीने आपण सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे’, असे त्या म्हणाल्या.

या वक्तव्यानंतर बऱ्याचजणांनी खेर यांच्यावर नाराजीचा सूर आळवत त्यांचा विरोध केला. परिस्थिती अधिकच चिघळत असल्याचे लक्षात येताच खेर यांनी सारवासारव करत संताप व्यक्त केला. ‘दिवस बदलत आहेत, मी फक्त मुलींच्या हिताच्याच दृष्टीने ते वक्तव्य केले होते, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांचा धिक्कार असो’, असे म्हणत खेर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत संतप्त प्रतिक्रिया दिली.

वाचा : पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायलाच पाहिजे: शरद पोंक्षे