‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर विद्या बालनच्या भुमिकेविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आता, विद्याने तिच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुलोचना ऊर्फ सुलूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

व्हिडिओत विद्या एका सामान्य गृहिणीच्या वेशभुषेत चाहत्यांना तिचा आगामी ‘तुम्हारी सुलू’ चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहे. यामध्ये तिची निरागस बोलण्याची पद्धत विशेष लक्ष वेधून घेते. याआधी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये विद्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. स्पर्धांमध्ये जिंकलेल्या भेटवस्तूंच्या मागे तिचा चेहरा लपलेला होता. मात्र आता या व्हिडिओमध्ये तिचा संपूर्ण लूक पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पोस्टरमध्ये लिहिलेला ‘मै कर सकती है’ #MainKarSaktiHai या हॅशटॅगने सर्वांच लक्ष वेधलं होतं. या हॅशटॅगचा नेमका काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण १४ सप्टेंबर रोजी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध होणार आहे.

वाचा : नॉर्वेतील ‘बॉलिवूड फेस्टिव्हल’मध्ये ‘इंदू सरकार’चा सन्मान 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त ४२ दिवसांत याची शूटिंग करण्यात आली. २३ एप्रिलला शूटिंगला सुरुवात झाली आणि जूनमध्ये चित्रपटाचं शूटिंग संपलं. एका गृहिणीचा रेडिओ जॉकी होईपर्यंतचा प्रवास यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तर अभिनेता मानव कौल तिच्या पतीची भूमिका साकारताना दिसेल. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेहा धुपिया, आरजे मलिष्का यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.