आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम करायलाच मिळते असे नाही. मात्र, काहीजण याबाबतीत सुदैवी असतात. त्यांना ज्या गोष्टीचा छंद आहे तीच गोष्ट काम म्हणून करण्याची संधी मिळते. साहजिकच या कामातून त्यांना इतरांपेक्षा अधिक आनंद मिळतो, अशा मध्यवर्ती कल्पनेभोवती आधारित विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चुल आणि मूल सांभाळणारी स्त्री जेव्हा स्वत:च्या पायावर उभी राहते, पैसे कमावू लागते, समोर येणाऱ्या अडचणींवर ती कशी मात करते, या कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटाला आतापर्यंत समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

वाचा : या चित्रपटातून रजनीकांत यांची मराठीत एन्ट्री

‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलू’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू करताना दिसते. पण, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार विद्याच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.८७ कोटींचा गल्ला कमवला आहे. सुट्टीच्या दिवशी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळण्याची शक्यताही तरण यांनी व्यक्त केली.

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने दिला आसरा

दरम्यान, रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत असून या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचसोबत चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दिवाळीत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘गोलमाल अगेन’ चा समावेश झाला आहे.