नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ही जोडी रिअल लाइफ नसून रिल लाइफ आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लग्नगाठ बांधणार आहेत. या मालिकेची प्रचंड लोकप्रियता असून विक्रांत-इशा या जोडीचीही फॅनफॉलोईंग खूप आहे. येत्या १३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार असून ११ तारखेला मेहंदी आणि १२ तारखेला साखरपुडा होणार आहे. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे. अशातच विक्रांत- इशाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये संगीत सोहळ्यात विक्रांत आणि इशा रोमॅण्टिक डान्स करताना पाहायला मिळत आहेत. विक्रांतने इशासाठी असलेलं त्याचं प्रेम नेहमीच अनोख्या पद्धतीने व्यक्त केलं आहे. या संगीत सोहळ्यातही या रोमॅण्टिक डान्सच्या माध्यमातून विक्रांतने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

वाचा : विवेक ओबेरॉय साकारणार मोदी; वाचा नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

लग्नासाठी कुटुंबीयांकडून परवानगी मिळवण्यासाठी इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले आहेत. अखेर १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हे लग्न होणार आहे. या लग्नाची बोलणी झाली असून इशाला सरंजामे कुटुंबीयांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे.