वेबसीरिजफेम युट्यूबर मल्लिका दुआ हिला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. उबर चालकासोबत झालेल्या वादात मल्लिकाला त्याने शिवीगाळ केल्याचंही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. उबर कारमधील एसीचं तापमान वाढवण्यास सांगताच तिला चालकाने कारमधून उतरायला भाग पाडलं. मल्लिकाने हा पूर्ण प्रसंग एका स्क्रीनशॉटसह तिच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला.

“मी चालकाला फक्त एसीचं तापमान वाढवण्यास सांगितलं. त्यावर त्याने माझ्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याने ‘ट्रीप’ संपवत ‘उतर गाडी से’ म्हणत मला बाहेरचा रस्ता दाखवला. एसी वाढवणार नाही यावरच तो अडूनच राहिला होता. ‘उबरला तुमची स्वत:ची कार समजा सांगतात तसं असं काही नसतं’, असं तो वारंवार म्हणत होता. त्यानंतर आमच्यात कडाक्याचं भांडण झालं’, असं मल्लिकाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

‘उबर इंडिया’ या कंपनीत चालकांचं प्रोफाईल न पाहताच त्यांना कामावर ठेवलं जातं, असा आरोप तिने या पोस्टमधून लावला. ज्यावेळी चालकाचा आवाज चढला त्याचवेळी मल्लिकानेही त्याला इंगा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर त्याने अश्लील शब्दांत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये दळणवळणाच्या सार्वजनिक सोयीसुविधांना वगळून काही खासगी कॅब सुविधांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. पण, चालकांची अशी मुजोरी चालत असेल तर मात्र या सुविधांचं भविष्य धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाही.

मल्लिकाने जाहीरपणे हा सर्व प्रकार उघड केल्यानंतर ‘उबर इंडिया’तर्फे तिची माफी मागण्यात आली. खुद्द मल्लिकानेच याविषयीची माहिती तिच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली. ‘त्या चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन उबर इंडियाने मला देऊ केलं आहे. अशा प्रकारची मुजोरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही’, अशा थेट शब्दांमध्ये तिने ही पोस्ट केली. मल्लिकाच्या या पोस्टनंतर निदान आता तरी चालकांची मुजोरी आणि त्यांच्या बेताल वागण्याचे प्रकार बंद होणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

View this post on Instagram

A post shared by M A L L I K A D U A (@mallikadua)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.