बॉलिवूडमध्ये कोणाशीही पंगा घ्या पण, सलमान खानशी पंगा घेऊ नका, असे काहीसे म्हटले जाते. आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सलमानशी शत्रूत्व पत्करण्याचा पुरेपूर अनुभव विवेक ओबेरॉयला आला, असे म्हणतात. ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे सलमानने आपल्याला धमकावल्याचे विवेकने २००३ साली घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.

या प्रकरणाला आता जवळपास १५ वर्षे उलटली असली तरी याच्या झळा अद्याप विवेकला सोसाव्या लागत आहेत. ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘मस्ती’ यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या विवेकला २००३च्या मुलाखतीनंतर निर्माते काम देण्यासाठी घाबरू लागले. यावर एका वृत्तपत्राला मुलाखत देताना विवेकने, त्यावेळी त्या व्यक्तीने माझ्याविरोधात जणू फतवाच काढल्यासारखे वाटत होते, असे म्हटले.

वाचा : ‘होय, माझं त्याच्यावर क्रश होतं’

विवेकच्याच जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानने मनात आणलं तरी तो बराच काळ त्याला काम मिळू देणार नव्हता. विवेकला काम देऊ नका, असे सलमानने एकवेळ सांगितलेही असेल. पण, त्यानंतर रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम यांच्यासोबतही सलमानचे पटत नव्हते. तरीही पुढच्या वर्षभर त्या दोघांनाही काम मिळाले.

आपले वैयक्तिक आयुष्य कसे उध्वस्त झाले याबद्दल विवेक म्हणाला की, वैयक्तिक आयुष्यात गोंधळ माजल्यामुळे माझे कशातच लक्ष लागत नव्हते. त्यानंतर मी हिट चित्रपट देऊनही मला कोणी काम देत नव्हते. ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ हा माझा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. पण, तरीही वर्षभर मला घरातच बसून राहावे लागले.

वाचा : ‘.. तर माझी पहिली पसंती रजनीकांत यांनाच असेल’

सुत्रांच्या माहितीनुसार, विवेकची चित्रपटांची निवडच चुकत होती. त्याने ‘हम तुम’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारखे मोठे चित्रपट नाकारले. तुमचे चित्रपट हिट होत असतील तर, कशाचीही पर्वा न करता लोक तुम्हाला काम देतात. विवेकने लागोपाठ ९ ते १० फ्लॉप चित्रपट दिले.

हे सगळं पाहता, विवेकच्या अपयशाचे कारण सलमान खान होता की, त्याने केलेल्या चुकीच्या चित्रपटांची निवड हे सांगणे कठीणच आहे.