अभिनेता सुशांत सिंह राजपूत व अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजन विश्वातील सर्वांत चर्चेतली जोडी होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेमाचं अंकुर फुललं. सुशांत जेव्हा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी तयारी करत होता तेव्हा तो महेंद्रसिंग धोनीच्या कुटुंबीयांच्या फार जवळ होता. धोनीला जवळून ओळखण्यासाठी त्याने सोबत खूप वेळ घालवला होता. त्याचवेळी एकदा सुशांतने अंकिता आणि धोनीची मुलगी झिवा यांची भेट घडवून दिली. तेव्हाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत.

धोनीच्या कुटुंबीयांशी भेट करून देण्यासाठी सुशांत अंकिताला त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्यावेळी अंकिता आणि सुशांत दोघांनीही झिवासोबत मजेशीर वेळ घालवला होता. या चित्रपटानंतर अंकिता आणि सुशांत यांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं.

आणखी वाचा : कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय सुशांतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला दीपिकाचा सवाल

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर सुशांत आणि अंकिताने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तेव्हा सुशांतने अंकिताला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.