‘क्रीअर्ज एण्टरटेनमेन्ट’ आणि दिग्दर्शक श्री नारायण सिंग ही दोन नावं तिसऱ्यांचा एकत्र आली असून त्यांचा नवा प्रोजेक्ट सध्या फार चर्चेत आहे. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या दोन चित्रपटानंतर ‘जॅस्मिन: स्टोरी ऑफ अ लीस्ड वोम्ब’ Jasmine: Story Of A Leased Womb हा तिसरा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. खऱ्या आयुष्यातील एका प्रसंगावर बेतलेली कथा या चित्रपटातून अधोरेखित करण्यात येणार आहे. यातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला विचारणा करण्यात आली आहे.

गुजरातमधील एका महिलेला आई व्हायचं नसतं, पण नंतर ती सरोगसीद्वारे इतरांसाठी आई होण्याचा निर्णय घेते. काही काळानंतर सरोगसीद्वारे जन्म दिलेल्या बाळासाठी भावनिकरित्या गुंतत जाते. त्या महिलेची भूमिका साकारण्यासाठी ‘क्रीअर्ज एण्टरटेनमेन्ट’च्या प्रेरणा अरोराने ऐश्वर्या रायला विचारलं आहे. यासंदर्भात ‘मुंबई मिरर’शी बोलताना प्रेरणा म्हणाली की, ‘ऐश्वर्याला सरोगेट मदरच्या भुमिकेसाठी विचारलं असून तिच्या उत्तराची आम्ही प्रतिक्षा करत आहोत.’ त्यामुळे आता ऐश्वर्या या चित्रपटात काम करायला तयार होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा आऊट?

सिद्धार्थ आणि गरिमा यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी तीन वर्ष मेहनत घेतली आहे. आता ऐश्वर्याचा होकार मिळाल्यावर लगेचच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.