एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या संकल्पनेवर आधारित ‘हृदयनाथ’ हा सिनेमा येत्या रविवारी स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी (२९ एप्रिल) दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जॅकी श्रॉफ आणि आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र आले आहेत. तर उर्मिला मातोंडकरचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवेल.

‘हृदयनाथ’ ही गोष्ट आहे तात्या सावंत (जॅकी श्रॉफ) या प्रामाणिक शिक्षकाची. पत्नी आणि मुलीसह राहणाऱ्या तात्यांविषयी गावात खूप आदराची भावना असते. अचानक एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यांना वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वीही होते. पण यानंतर तात्यांच्या आयुष्याचा कायापालट होतो. ते नवाब पारकर या कुप्रसिद्ध गुंडासारखे वागायला लागतात. त्यांची भाषा पूर्णपणे बदलते. ते लोकांकडून खंडणी वसूल करायला लागतात. तात्यांचे हे बदललेले वर्तन पाहून सगळेच थक्क होतात. हृदय विकाराच्या धक्क्यानंतर तात्या कसे वाचतात? शस्त्रक्रियेनंतर तात्यांचं आयुष्य कसं बदलतं? याची धमाल गोष्ट ‘हृदयनाथ’ या चित्रपटात पाहायला मिळते.

वाचा : नागार्जुनच्या सुनेबद्दल या गोष्टी माहितीहेत का?

जॅकी श्रॉफ आणि आदित्या पांचोली या सिनेमातून प्रथमच मराठीमध्ये एकत्र आले आहेत. त्यांच्यासह स्वरांगी मराठे, चिन्मयी सुर्वे, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उर्मिला मातोंडकरचं ‘याना याना’ हे आयटम साँगही या सिनेमाचं आकर्षण आहे. नीलेश वाघमारे यांच्या हार्ट टू हार्ट प्रॉडक्शन निर्मिती हा सिनेमा अमर गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे तर संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.