‘मिले जब हम तुम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री रती पांडे आता एका आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. ‘बेगुसराई’ या मालिकेत झळकलेली रती आता ‘पोरस या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आपल्या वयाहून मोठी भूमिका साकारण्यासाठी सध्या ती सज्ज झाली असून, हा निर्णय घेणे आपल्यासाठी तितकेच कठीण असल्याचेही तिने स्पष्ट केले.

‘१८ ते २० वर्षांच्या एखाद्या मुलीला तिच्या वयाहून मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळणे ही काही नवी बाब नाही. पण, अशा भूमिका साकारल्यानंतर तिला पुढे काम मिळणार नाही ही समजूत ठेवणे फारच वाईट आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला आईच्या भूमिका आल्या, की तिला मुख्य भूमिकांसाठी विचारले जात नाही असाच अनेकांचा समज आहे. अशा प्रकारे विचार करणाऱ्यांची मला कीव येते’, असे रती म्हणाली.

माध्यमांशी बोलताना तिने आपल्या मनातील दडपण सर्वांसमोर आणले. ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर या भूमिकेबद्दल मी स्वत:सुद्धा साशंक होते. ही भूमिका साकारल्यानंतर माझ्याविषयीही असेच अंदाज बांधले जातील असेच मला वाटू लागले होते. त्यामुळे मी आमच्या मालिकेचे निर्माते सिद्धार्थ तिवारी यांनाही याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी माझी समजूत काढत, या मालिकेत तुझे सौंदर्य आणखीन खुलवण्याचा आम्ही प्रयत्न करु असे ते म्हणाले’.

https://www.instagram.com/p/BZ2jb__BEvd/

https://www.instagram.com/p/BaOrTCcB-4-/

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

रती ‘पोरस’ या मालिकेमध्ये एका चरित्रात्मक भूमिकेत दिसणार असून तिच्या भूमिकेलाही बराच वाव देण्यात आला आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या मालिकेतील भूमिकेसाठी रतीने बरीच मेहनत घेतली आहे. ‘मालिकेत मी एका लढवैय्या राणीच्या भूमिकेत झळकणार असल्यामुळे मला घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकावी लागली. या निमित्ताने मी स्वत:हून काही साहसदृश्ये केली’, असेही तिने स्पष्ट केले. मालिकेतील भूमिका जितकी आव्हानात्मक आहे तितकीच ती बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जात असल्याचेही रतीने सांगितले. तेव्हा आता तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.