आई-वडील, मुलगा-मुलगी ही नाती कायम असतात. पण या घट्ट नात्यांचा गोडवा जाणवण्यासाठी ती नाती समजून-उमजून फुलवावी लागतात. हेच दिग्दर्शक वरुण नार्वेकर याने ‘मुरांबा’ या त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात दाखवले आहे. सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित, अमेय वाघ आणि मिथिला पालकर अशा आजवर न पाहिलेल्या जोडय़ा घेऊन त्याने कौटुंबिक कथेला तिरपा छेद देणारी कथा रंगवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : देवसेनेला हात लावाल, तर महागात पडेल!

‘मुरांबा’ चित्रपटातील आलोक आणि इंदू अर्थात अमेय वाघ व मिथिला पालकर यांचीच सध्या धूम सुरु असल्याचं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. ‘बच्चन देऊ नका…’ आणि ‘७० च्या दशकातील आईसारखी वागू नकोस’ असे संवाद चित्रपटातील आई-वडिलांना म्हणणाऱ्या अमेयने नुकताच त्याचा ‘मुरांबा’ चित्रपट खऱ्या आयुष्यातील आई-बाबांना दाखविला. आपल्या मुलाचा हा चित्रपट पाहून अमेयचे आई-वडील भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. स्वतः अमेयनेच असे त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे. आई-बाबांसोबतचा फोटो शेअर करत अमेयने लिहिलंय की, चित्रपटाला उत्तम ओपनिंग मिळालं आहे. तुम्हा सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय याचा आनंद आहेच…. पण काल आईबाबांनी चित्रपट बघितला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं! सगळ्याचं सार्थक झालं! काल माझ्यासाठी हा मुरांबा खऱ्या अर्थाने मुरला!

आजच्या तरुणाईच्या मनातील स्पंदने टिपत त्यांच्या भावविश्वात बदलत्या जीवनशैलीमुळे सरमिसळ होत असताना इतर नात्यांमुळे नात्यांची गुंफण अधिकच कशी घट्ट होते याकडे ‘मुरांबा’ने लक्ष वेधले आहे. मिथिला पालकर हे नाव वेबदुनियेत बरेच प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांमध्ये केवळ मराठीच नाही तर अमराठी लोकांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे तिच्या या प्रसिद्धीचा चित्रपटालाही फायदा होईल यात शंका नाही.  ‘मुरांबा’ हा नावाप्रमाणेच मुरलेल्या नात्यांचा वेध घेणारा गोड चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रोमोज आणि समाजमाध्यमांवरच्या वैविध्यपूर्ण जाहिरातींनी याआधीच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey waghs parents get emotional after watching muramba movie