बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे राम गोपाल वर्माच्या ‘सरकार’ सीरिजमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारल्यानंतर आता पुन्हा एकदा वास्तववादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झालेत. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या पहिल्याच हिंदी चित्रपटात बिग बी मुख्य भूमिका साकारताना दिसतील.
नागराजच्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. अमिताभ चित्रपटात नागपूरमध्ये जवळपास दशकभरापूर्वी ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे विजय बार्से यांची भूमिका साकारताना दिसतील. फुटबॉल खेळात आपले भवितव्य घडवण्यासाठी ही संस्था गरीब मुलांना मदत करते.
वाचा : सेलिब्रिटींच्या घरांचे वीज बिल पाहून तुम्हालाही बसेल ‘करंट’!
अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने नागराज सध्या खूप खूश आहे. ऑक्टोबर महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाची सर्व माहिती नागराजने गुपित ठेवली आहे. ‘हा चित्रपट वास्तविक व्यक्तिरेखेवर आधारित आहे, एवढेच मी सध्या सांगू शकतो. पण, मी लिहिलेली चित्रपटाची कथा ही मूळ कथानकापेक्षा खूप वेगळी आहे,’ असे नागराज म्हणाला.
वाचा : माहेरचा गणपती ‘आमच्याकडे पुजेचा मान ‘त्या’ महिलेला देतात’
गेल्या दोन वर्षांपासून नागराज हा बच्चन यांच्यावरील चित्रपटाच्या कथेवर काम करत होता. ‘गेली काही वर्षे मी या विषयाबद्दल माहिती जमा करत होतो. पटकथेवर जास्तीत जास्त वेळ घालवण्यात मला काहीच चुकीचे वाटत नाही. ‘सैराट’च्या पटकथेवर मी आठ वर्षे काम केले. या चित्रपटाची कथा मी पूर्णपणे बच्चन साहेब यांनाच डोक्यात धरून लिहिलीये. लहानपणापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे.’
बच्चन भक्त असलेल्या नागराजने त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला की, ‘मला माहित नाही पण त्यांना भेटल्यावरही मी शांत आणि स्वतःवर नियंत्रण ठेऊन होतो. खरंतर मला माझ्या जागेवरून उठून उड्या मारायच्या होत्या, नाचायचं होतं. तरीही मी अगदी शांतपणे त्यांना पटकथा वाचून दाखवली. मी त्यांचा आजन्म चाहता राहीन. त्यावेळी मी अगदी शांत राहिलो याचा मला आनंद आहे. कारण त्यावेळी मला केवळ त्यांचा चाहता म्हणून त्यांच्या समोर जायचे नव्हते. पण, जेव्हा माझा चित्रपट पूर्ण होईल तेव्हा पहिल्या भेटीवेळी मी माझ्या भावना आणि उत्साहावर कसे नियंत्रण ठेवलेले ते त्यांना नक्कीच सांगेन.’ दरम्यान, नागराजने आता केवळ या चित्रपटावरच लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे.