कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला सुरुवातीच्या काळात यश मिळतच असं नाही. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला काही अडचणी येतातच. दर दिवशी चित्रपटसृष्टीत येणारे नवोदित अभिनेते, विविध विषयांवरील चित्रपट आणि त्यातून निर्माण होणारी स्पर्धा या सर्व गोष्टींचा सामना अभिनेता सलमान खानलाही करावा लागला होता. दबंग खान, भाईजान अशी ओळख निर्माण होण्यापूर्वी सलमनाच्या चित्रपट कारकिर्दीतही अपयशाचे वळण आले होते. ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्हं उभे राहिले होते. चित्रपटसृष्टीत त्यावेळी सलमान खान हे नाव लयास जाण्याच्या मार्गावर होते. पण, त्याच काळात एका अशा दाक्षिणात्य चित्रपटाने सलमानला साथ दिली की त्याच्या करिअरला एक कलाटणीच मिळाली.
चित्रपटसृष्टीत कठीण काळ सुरू असताना सलमानच्या मदतीला धावून आलेला तो चित्रपट म्हणजे ‘सेतू’. बाला यांनी दिग्दर्शित केलेल्या या तमिळ चित्रपटात अभिनेता विक्रम, अबिता, शिवकुमार, श्रीमान या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याच चित्रपटाच्या कथानकावर आधारित हिंदी चित्रपट करण्याचा दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी निर्णय घेतला. सेतूच्या हिंदी रिमेकला ‘तेरे नाम’ असं नाव देण्यात आलं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून सलमानच्या अभिनय कौशल्याची झलक पाहायला मिळाली होती.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
‘अपिरिचित’ फेम अभिनेता विक्रमने ‘सेतू’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती. विक्रमच्या अभिनयाचाच आधार घेत सलमाननेही ‘तेरे नाम’मध्ये ‘राधे’ ही भूमिका रंगवली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयापासून ते गाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ‘तेरे नाम’च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावून गेली. त्यामुळे सलमानच्या वाट्याला आलेल्या यशामध्ये अप्रत्यक्षरित्या दाक्षिणात्य अभिनेता विक्रम आणि त्याचा ‘सेतू’ हा चित्रपटही जबाबदार असल्याचं अनेकांचं मत आहे.