‘राजी’ या चित्रपटानंतर आलिया भट्टने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या आलियाने येत्या काळातही हे काम अविरतपणे सुरुच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही काळापासून आलियाच्या आगामी चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगत आहेत. ज्यामध्ये तिच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला आहे.
आलिया आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत असल्यामुळेच या चर्चा रंगत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवरच सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आलियाने चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा तिच्या लग्नाविषयीसुद्धा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असणाऱ्या ‘आस्क मी एनिथिंग’, मध्ये आलियाही सहभागी झाली. याचदरम्यान, तू लग्नानंतर अभिनय क्षेत्र सोडणार का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत आलियाने लिहिलं, ‘लग्नानंतर आपलं स्टेटस बदलण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला आयुष्यातून दूर लोटण्याची गरज नसते. मी शक्य आहे तोपर्यंत अभिनय करतच राहणार आहे.’ तिच्या या उत्तरामुळे आता जरी येत्या काळात आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकले तरी ती मात्र कलाविश्वातून काढता पाय घेणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा
आपल्या खासगी आयुष्याला कामापासून दूर ठेवत दोन्ही गोष्टींना तितकच महत्त्वं देताना ती दिसत आहे. याशिवाय रणबीरच्या कुटुंबियांसोबतही ती अनेकदा वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे आता ही बहुचर्चित जोडी त्यांच्या नात्याची नवी सुरुवात केव्हा करते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.