चित्रपटांमध्ये कधीही काहीही होऊ शकतं, हे म्हणतात ते अगदी खरेच आहे. कारण इथे कधी कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका येईल याचा काहीच नेम नाही. विविध धाटणीची कथानकं तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान किंवा मोठ्या अभिनेत्यांसोबतही स्क्रीन शेअर केलीये. मुख्य म्हणजे कलाकारांनी इतक्या शिताफीनं त्यांच्या भूमिका बजावल्या की त्यांच्या वयाचा अंदाजही कोणाला आला नाही.
प्रेक्षकांची पसंती मिळवणारं असंच एक ऑनस्क्रीन नातं म्हणजे आई- मुलाचं. विविध मार्गांनी काही महत्त्वाचे संदेश आणि नात्यामध्ये असणारे बंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ऑनस्क्रीन आई- मुलाच्या जोड्यांना बरीच पसंती मिळाली. पण, आई मुलाच्या वयांमध्ये असणारं अंतर जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
रुपेरी पडद्यावर आई- मुलाच्या गाजलेल्या जोड्यांचा उल्लेख येताच, अभिनेत्री रिमा लागू आणि सलमान खान. रिमाताई आणि सलमान यांचं नातं म्हणजे आई- मुलाच्या नात्याची सुरेख मांडणीच जणू. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्यावेळी सलमानचं वय २४ वर्षे इतकं होतं. तर त्याच्या आईच्या भूमिकेत झळकलेल्या रिमा लागू यांचं वय ३१ वर्षे इतकं होतं.
‘मेरा वचन ही है शासन’ असं म्हणणारी ‘राजमाता शिवगामी देवी’ म्हणजेच अभिनेत्री रम्या कृष्णन आणि ‘बाहुबली’ प्रभास यांच्या नात्यातही फारसं अंतर नाही. रम्याचं वय ४६ वर्षे असून प्रभास ३७ वर्षांचा आहे. ऑनस्क्रीन राजमाता आणि बाहुबलीची ही जोडी अनेकांच्याच पसंतीची आहे.
हृतिक रोशनचा ‘यादें’ हा चित्रपट आजही अनेकांच्याच आवडीचा आहे. या चित्रपटामध्ये श्रीमंतीचा माज असलेल्या त्याच्या आईच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री हिमानी त्याच्याहून फक्त एका वर्षानेच मोठी होती.
आई- मुलाच्या काही अजरामर भूमिकांमध्ये आणखी एका जोडीचा आवर्जून उल्लेख केला जातो. ती जोडी म्हणजे ‘मदर इंडिया’ फेम अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेता सुनील दत्त. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा नर्गिस यांचं वय २८ वर्षे होतं. तर, सुनील दत्त यांचं वय २९ वर्षे होतं. या चित्रपटाच्या सेटवरच नर्गिस आणि सुनील दत्त एकमेकांच्या प्रेमात पडले असून, त्यानंतर ते विवाहबंधनातही अडकले होते.
बी- टाऊनमधील ऑनस्क्रीन आई- मुलाची आणखी एक जोडी म्हणजे फरीदा जलाल आणि अनिल कपूर. ‘लाडला’ चित्रपटातून त्यांचं हे सुरेख नातं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. पण, तुम्हाला माहितीये का, आईच्या भूमिका चोखंदळपणे साकारणाऱ्या फरीदा जलाल अनिल कपूरपेक्षा फक्त ८ वर्षांनी मोठया आहेत.
‘दबंग’ चित्रपटामध्ये झळकलेली आई- मुलांची जोडीसुद्धा अनेकांच्याच आवडीची आहे. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी या चित्रपटात सलमान आणि अरबाज खान यांच्या आईची भूमिका साकारली होती. या तिघांच्याही वयात फारसं अंतर नाहीये.
बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री या त्यांच्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. अभिनेत्री रिमा लागूसुद्धा त्यापैकीच एक आहेत. सलमान खानच्या आईच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिमाताईंनी ‘कल हो ना हो’ या चित्रपटात बॉलिवूड किंग शाहरुखच्या आईची भूमिका साकारली होती. शाहरुख आणि रिमा लागू यांच्या वयात फक्त सात वर्षांचंच अंतर आहे.
वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?
(वरील मजकूर काही वेबसाइट्सवरील उपलब्ध माहितीच्या आधारे घेण्यात आला असून लोकसत्ता ऑनलाइनने याबाबत खातरजमा केलेली नाही.)