हॉकी या खेळाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत अभिनेता अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खेळाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची जोड असणारं कथानक ‘गोल्ड’ या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. यामध्ये अक्षय तपन दास ही भूमिका साकारत आहे. अशा या चित्रपटातील गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘नैनोने बांधी…’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांची सुरेख अशी ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्याची संधा चाहत्यंना मिळत आहे. गतकाळात प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, संकटप्रसंगी त्या व्यक्तीचा आत्मविश्वास न डगमगू देण्यासाठी झटण्यासाठीच्या प्रत्येक भावना या गाण्यात टीपण्यात आल्या आहेत. यासिर देसाईने गायलेल्या या गाण्यातून प्रेमाची भावना एका वेगळ्याच काळाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खिलाडी कुमार आणि मौनी रॉय यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला हा ‘गोल्ड’न टच मिळाला असं म्हणायला हरकत नाही.
वाचा : ..आणि अभिनयासाठी कवी कुमार आझादांनी सोडलं होतं घर!
टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर मौनी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीला एका वेगळ्याच स्तरावर नेऊ शकतो ही बाबही नाकारता येणार नाही. खिलाडी कुमार आणि मौनी यांच्याशिवाय या चित्रपटात कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.