वैभव मांगले
माझी आजी मुंबईत माझ्याकडे आठ-नऊ वर्षे राहिली. माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस मी तिला माझ्याकडे आणली होती. तेव्हाच ती साधारण ७५ वर्षांची होती. दुसऱ्या मुलाच्या वेळेस ती थकली होती आणि त्याचं करायला माझी आई माझ्याकडे येऊन राहिली होती. आजीला जाऊन आता एक वर्ष झालं. त्या अगोदर बरोबर एक वर्ष एके दिवशी ती मला म्हणाली, वैभव मी आता गावाला जाऊन राहते. कासार कोळवणला. मी म्हटलं, उगाच जायचंय म्हणून जाऊ नको. इथे कंटाळा आला असेल तरच जा. त्यावर ती म्हणाली, बाबा, आता इथे तुला माझा काही उपयोग नाही. तिथे जाऊन राहिले तर तिथल्या सुनेला काही उपयोग होईल. मी म्हणालो, आता या वयात कुठे कुणाला काय उपयोग होईल याचा विचार कशाला करत बसतेस. आराम कर आता. खूप केलंस सगळ्यांचं. ती म्हणाली, बाबा जेवढं होतंय तेवढं करावं, हात-पाय चालतात तेवढंच जीवन असतं. ते बंद झालं म्हणजे माणसाने निघून जावं. नंतर कासार कोळवणला गेली ती.
ती गेली आणि पुढच्या सहा महिन्यात ती आजारी पडायला लागली. तिला आताशा अन्नपाणी जात नव्हतं. माझ्याकडे होती तेव्हाही विशेष काही खातपीत नव्हती. तोंडाला चव नाही म्हणायची. त्यामुळे अशक्त होत चालली होती. वासना उडाली होती तिची अन्नावरची. आजारी पडायला लागली. एखाद्या खोलीत पडून असायची. गेली तेव्हा सुनेला चांगला हातभार लावला तिच्या कामामध्ये. भाकऱ्या करत होती. अंगण, घर झाडून घ्यायची. पण मुळात पोटात नीट अन्न जात नव्हतं. त्यामुळे अजून अशक्त होत गेली आणि आजारी पडायला लागली. एके दिवशी भावाने मला फोन केला. ‘दादा, आजी खूप अशक्त झाली आहे. ताप आहे. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. डॉक्टर म्हणाले की, वृद्धापकाळाने शरीर कमजोर होतंय. आणि एक किडनी काम करत नाहीये. दुसऱ्या किडनीवर भार येऊन ती सुजली आहे. त्यामुळे आता त्यांचं कठीण आहे सगळं. या वयात ऑपरेशन (किडनी ट्रान्सप्लान्ट) वगैरे झेपणार नाही. औषध पाण्यावर जेवढं निभावतंय तेवढं बघू.’ मला या सगळ्याचा अंदाज आला होता आधीच. तिची जगण्याची पण इच्छा अलीकडे संपत चालली होती. माझ्याकडे होती तेव्हा म्हणायची, ‘बास झालं आता सगळं. काही नको आता.
बाबा, तोंडाची चव गेली की माणसानं समजावं काळ जवळ आला’. मी म्हणायचो, ‘हट.. असं कुठे असतं का?’ म्हणायची, ‘माझ्या डोळ्यांसमोर माझे वडील गेले. माझा नवरा गेला. दीर गेला. सगळे शेवटी शेवटी म्हणायचे, निर्मला तोंडाची चव गेली. काही गोड लागत नाही. तोच धडा मी शिकले आहे. मलाही कळलंय माझं आयुष्य संपत आलं आता.’ माझ्या पोटात कालवायचं. ती म्हणत होती ते खोटं नव्हतं. तिची जीवनावरची वासना उडाली होती. तिकडच्या जगाचा तिला ध्यास लागला होता.
भाऊ (विनायक) म्हणाला, ‘काय करायचं दादा’. म्हटलं, ‘घरी घेऊन जा.’ घरी गेली ती पण परत दोन-तीन दिवसात फोन आला. पाण्याशिवाय दुसरं काही घेत नाही आणि म्हणतेय तुझ्या मुलांना पाहावंसं वाटतंय. लगोलग माझी बायको (मयूरी), दोन मुलं आणि आई देवरुखला गेले. (तिथे माझं घर आहे. तिला तिथेच ठेवली होती.) बायको तिला भेटून परत आली. मला म्हणाली, ‘जमेल तितकं लवकर जा. त्यांचं काही खरं वाटत नाही. आता चेहऱ्यावर दिसतंय सगळं. कधीही कारभार आटोपेल.’
मला त्या दरम्यान खूप काम होतं. ‘सौभाग्यवती’ मालिका चालू झाली होती नुकतीच आणि महिन्याचे २५ दिवस काम करावं लागत होतं. त्यातून नाटकाचे प्रयोग चालू होते. मी बायकोला म्हटलं जरा उसंत मिळाली की जातो. भावाबरोबर मध्येमध्ये ती कशी आहे, वगैरे बोलणं चालू होतं. बरी आहे, आज जरा खाल्लं, प्यायलं तो सांगत होता. पण मी आतून धास्तावलो होतो. खरंच आजी जाणार नाही ना, या विचाराने एके दिवशी सकाळी मी शूटिंगला गेलो आणि मेकअप करण्यासाठी बसलो तेवढय़ात भावाचा फोन आला. ‘दादा जसा असशील तसा निघून ये. आजीचं काही खरं नाही. आज सकाळी उठल्यावर म्हणाली, ‘वैभव आल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही’ मी आमचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीशी बोललो. तो जा म्हणाला. मी निघालो. दोन-दोन तासांनी कुठे पोहोचलास, असे फोन येत होते. माझा जीव थाऱ्यावर नव्हता. खूप त्रास होत होता. वाटत होतं की ही मला न भेटताच जातेय की काय. शेवटचं बोललं पाहिजे तिच्याशी. नाही तर आयुष्यभर ही गोष्ट सलत राहील मला. खूप रडू येत होतं आणि माझी आजी मला माझ्या लहानपणीची आठवायला लागली.
तिच्या मोठय़ा मुलाचा मी मोठा मुलगा. त्यामुळे माझे लाड होणं स्वाभाविक होतं. पण माझ्या पाठोपाठ बहीणही झाली वर्षभरामध्ये. त्यामुळे माझे लाड लगेच विभागले गेले. पण मी आजीशी जो जोडला गेलो तो गेलोच. माझे आजोबा मधुमेहाने आजारी असत. त्यांचा पाय काढला होता. डोळे निकामी झाले होते. त्यामुळे आजी त्यांचं सगळंच करत असे. त्यात त्यांना टीबी झाल्यामुळे त्याचा संसर्ग आम्हा मुलांना होऊ नये म्हणून माझे आई-वडील आणि आम्ही वेगळे राहायला लागलो. आजोबा सतत हॉस्पिटलमध्ये असत. एके दिवशी सकाळी कुणीतरी बातमी आणली की आजोबा हॉस्पिटलमधून घरी आलेत. मी तेव्हा साताठ वर्षांचा असेन. घरात कुणालाही न सांगता उन्हातून तसाच निघालो. आजी दूध आणायला गेली होती. आजोबा एकटेच होते. मी दार उघडून आत गेलो आणि त्यांना मिठी मारली. आजी आली आणि म्हणाली ‘वैभव एकटाच आलास न सांगता. आई ओरडेल ना आता’. मला रडू यायला लागलं. म्हटलं, ‘नको ना सांगू तिला’. तिला साडवली येथे लग्नाला जायचं होतं. तिने तसाच मला हाताशी धरला आणि चल म्हणाली. घरी आली. आई शोधाशोध करत होती. आईला म्हणाली, ‘रागवू नको त्याला. न सांगता आला होता खरा पण जाऊ दे आता.’ माझ्या पाठच्या बहिणीला घेऊन लग्नाला गेलो मग आम्ही.
जसजसा मोठा झालो तसतशी एक गोष्ट लक्षात आली माझ्या की ही बाई सतत राबत असते कुणा ना कुणासाठी तरी. मीसुद्धा कोळवणला जात असे. तेव्हा ती मला सांगत असे ‘वैभव आपण जड होत नाही कुणाला’. यामागे तिची शोकांतिका होती. ती धाकटी होती. नवरा सतत आजारी. सतत पैसे लागत. दोन दीरच ते पुरवत होते. त्यामुळे तिच्या मनात ते होतं कुठेतरी. आमच्या कोळवणच्या मूळ घरात ती सतत अत्यंत श्रमाचीच काम करीत असे. सकाळी उठून पूर्ण घर झाडणे, अंगण झाडणे, सारवणे करणे, पोतेरे करणे, सगळ्यांचे सगळ्यांच्या न्याहरीच्या, जेवणाच्या भाकरी करणे. आणि सगळं झाल्यावरच नाश्ता, जेवण करणे. खूप कष्ट करायची. तीच सवय मला लागली कष्टांची. १४ बाळंतपण केली तिने. सुनांची, भाच्यांची, पुतण्यांची. कुणी आजारी पडलं, हॉस्पिटलमध्ये आहे म्हटलं की, हिला आमंत्रण. आणि ही हजर असायची तिकडे. आजही तिच्या या मदतीची सगळ्यांना कदर आहे. एवढी मदत केली आणि कुणी पैसे देऊ केले की नको म्हणायची. एखादी साडी घे म्हणायची. कसलीच अपेक्षा नव्हती तिची. कुणाकडूनच. ना मुलांकडून, सुनांकडून, कुणाकडूनच नाही. त्यामुळे तिच्या मदतीचं ऋण सगळ्यांवर राहिले.
म्हणायची, हौसमौज सगळी फार लवकर संपली. हे आजारी पडायला लागले आणि सगळं चित्र पालटलं. कशाची नंतर हौस नाही राहिली आणि कुणाकडून कशाची अपेक्षा करणं मी सोडून दिलंय. तिच्यासारखं निरपेक्ष आयुष्य फार क्वचित कुणाचं पाहिलंय. तिच्या या काम करत राहण्याच्या आणि निरपेक्ष आयुष्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. तिला भावना नव्हत्या असं नाही. तिने त्या मारल्या होत्या. मी घरी कधी असलो आणि काहीही खायला घेतलं अगदी चणे शेंगदाणेसुद्धा तर तिला दिल्याशिवाय कधी खाल्लं नाही. म्हणायची, ‘बाळा घास नाही चुकवत हो माझ्यासाठीचा.’ डोळ्यात पाणी यायचं तिच्या. काय अगदी सोनं घेऊन देत होतो तिला. पण एखादा आपल्यातला घास तिला दिला तर तिला भरून येई. सासरी कधी कपभर दूध घ्यायचासुद्धा तिला अधिकार नव्हता. कुणी काही दिलं तरच ती खात असे. म्हणून कुणी जाणूनबुजून तिला खाणं विचारलं तर तिला खूप भरून यायचं. तिला खूप ऐकून घ्यावं लागे कधी काही चुकलं तर. पण नवऱ्याच्या आजारपणाकडे बघून ती मुकाट सहन करीत असे. कधी कुणाला उलटून बोलली नाही.
नात्यांमधल्या अपेक्षा तिने कधी केल्या नाहीत. कुणी आपल्यासाठी काही करावं असं तिने कधी अपेक्षिलं नाही. अगदी पोटच्या पोरांकडूनही नाही. हाच तिचा गुण तिला शेवटपर्यंत आनंदी ठेवू शकला. मी तिला कधीही रडताना पाहिलं नाही. माझ्या आयुष्यात असं झालं, तसं झालं, माझं वाईट झालं, मी खूप दु:खं भोगलं, मला खूप यातना झाल्या, मला हे हवं होतं, ते हवं होतं, माझं आयुष्य वाया गेलं असं तिच्या तोंडून मी कधीच ऐकलं नाही. मला वाटतं असं निरपेक्ष आयुष्य जगायला एक तपश्चर्या लागते. ती तिची होती. सतत काम करताना ती कधीही कुणाला जड झाली नाही. ती सगळ्यांना हवीहवीशी वाटत होती. मलाही. माझी मुलगी लहान होती. मी तिला माझ्याकडे येण्याची गळ घातली. मला म्हणाली, ‘बाबा माझ्याकडून काही होणार नाही आता. वय झालं.’ म्हटलं, ‘नुसती ये. एक बाई कामाला असेल. तिच्यावर लक्ष ठेवायला ये.’ तयार झाली. दुसऱ्या दिवशी निघायच्या आधी रात्री तिला ताप आला. मला म्हणाली, ‘कुणाला सांगू नको. नाहीतर मला पाठवणार नाहीत. गोळी दे मी झोपते. उद्या लवकर निघू.’ मी सकाळी तिला उठवलं. ट्रेनमध्ये झोपवून आणलं. घरी आल्यावर मला लगेच कामाला निघायचं होतं. म्हणाली, ‘कुठे काय आहे एकदा दाखव फक्त.’ मी दाखवलं. संध्याकाळी घरी आलो तर तिने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. (तेव्हा बायको मुलीला घेऊन माहेरी गेली होती) तिची हीच कर्तबगारी मला चकित करत असे. कुठेही गेली कुणाकडेही गेली की ते घर कधीही परकं वाटत नसे. हाच तिचा गुण माझ्याकडे आला आहे. मी कुणाकडेही गेलो की एका क्षणात ते मला आपलं वाटून जातं आणि कुणाकडे कसलंही काम करायला तर मला लाज वाटत नसे. (आता ते शक्य होत नाही). माझ्या चार महिन्यांच्या मुलीचं ती आंघोळीपासून सगळं करत असे. लहान मुलांना ती अंगावर न घेता तासन्तास खेळवत असे. सगळं करायचं सगळ्यांसाठी पण भावनिक गुंतवणूक कशात नाही. बायको घरी संध्याकाळी घरी आली की ही मुलीला तिच्या हाती सोपवून टीव्हीमध्ये मन घालून बसायची. पण टीव्ही बघताना भाज्या नीट करणे, चिरून देणे ही कामं करतच असे. पण माझ्या मुलीतून (पौलोमी) लक्ष काढून घेत असे. तिच्याशी कधी कुणी वाईट वागलं तर तिला त्याचं वाईट वाटत नसे. ते बाजूला ठेवून पुढे जायचं असतं, असं ती म्हणायची. कुणाबद्दल काही वाईट बोलताना मी तिला कधी पाहिलं नाही. कशाबद्दल तक्रार केली नाही तिने. नेहमी आनंदी असायची. हळूहळू अन्न कमी केलं तिने. आंब्याच्या सीझनमध्ये आवडीने आंबा खायची. रोज आंबा लागायचा तिला. तेवढीच काय ती आशा. पण पाऊस पडला की आंबा बंद. दही आवडायचं तिला तेही फक्त दोन चमचे घ्यायची. मयूरी पाणीपुरी छान करते. ती तिला आवडायची. तिला जेवण करण्यामध्येही फार रस नसायचा. कारण म्हणायची तसा प्रसंगच कधी आला नाही माझ्यावर. जेवताना भाजी फार कमी लागायची तिला. म्हणायचो, ‘अगं भाज्या खात जा ना.’ तर म्हणायची, ‘असं सगळ्यांत शेवटी पुसून भाकरी खायचे मी. त्यामुळे ताटात खूप भाजी पाहिली की कसंतरीच होतं मला’
अशी माझी आजी थकली. मी म्हणायचो आजी मृत्यूचं भय नाही वाटतं? ती म्हणायची, ‘काय भय वाटायचं. आला माणूस जायचाच. एकदा डोळे बंद झाले की संपलं. स्वर्ग नाही, नरक नाही, पुनर्जन्म नाही. श्वास थांबला की आपल्यासाठी जग संपलं.’ केवढं हे तत्त्वज्ञान. कुठे शिकून आली होती काय माहीत. ती अख्खं आयुष्यच अत्यंत तिऱ्हाईतपणे जगली. स्वत:ला बाजूला ठेवून ती सगळं जग पाहू शकायची. म्हणून ती आनंदी होती. तिला साधं कधी देव देव करतानाही मी पाहिलं नाही.
Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी
मी कसाबसा स्वत:ला सावरत घरी पोहोचलो. तिला धाप लागली होती. आजी अशी जोरात हाक मारली. तिने डोळे उघडले. म्हणाली, ‘बाबा, आलास. बरं झालं आलास वेळेवर. मी चालले आता. सांभाळून राहा.’ संध्याकाळी तिची धाप वाढली. सगळं शांत होत चाललं होतं. तिचे सगळे नातेवाईक जमले होते. आम्ही सगळे तिच्याबद्दलच्या सुंदर आठवणी जागवत होतो. तिने कुणाकुणासाठी काय काय केलं हे आठवत होतो. मी म्हटलं, आजी आता शांतपणे जा. खूप चांगलं आयुष्य तुला मिळालं. खूप कमी लोकांना असं आयुष्य मिळतं. आनंदाने जा. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. रात्री धाप खूप वाढली. मी एकटाच होतो तिच्याबरोबर. तिच्या जवळ जाऊन कानात सांगितलं. आजी शांतपणे जा. उद्या दुपारी मला जायचं आहे. प्रयोग आहे नाटकाचा. शूटिंग आहे. मी आहे तोवर जा. सकाळी तिचा हात हातात होता. तिचा चेहरा खूप शांत आणि आनंदी दिसत होता. चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. सगळे आजूबाजूला तिच्याविषयी बोलत असताना तिचा हात माझ्या हातात उपडा पडला. प्राण गेला.
माझ्या आयुष्यावर तिचा खूप मोठा प्रभाव आहे. तिची आठवण होत नाही असा दिवस नाही. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर आणि तिचंही माझ्यावर. सगळ्यांना नेहमी सांगायची. ‘म्हातारपणात तरी सुखं आलं नशिबात. वैभवनं माझं सगळं केलं. मी केलं सगळ्यांचं. ते असं वर आलं नातवाच्या रूपाने!’
वैभव मांगले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा