आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सुबोध भावे येत्या काळात बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची भेट घेणार आहे. संवेदनशील अभिनय, संवादकौशल्य आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर सुबोधने त्याचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. सुबोधच्या या कारकिर्दीत त्याच्यासह स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीही विशेष चर्चेत राहिल्या आहेत. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. स्वत: सुबोधनेच त्यासंबंधीचा एक फोटो शेअर केला.
सुबोधने ट्विटवरवरुन शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी. हा फोटो पोस्ट करत सुबोधने तिच्यासोबत आगामी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेतून सध्या प्राजक्ता प्रेक्षकांची मनं जिंकतेय. याआधीसुद्धा विविध मालिकांतून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण, सुबोधसोबत चित्रपटात काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ असून, त्याच्या अनुभवाच्या साथीने तिला बरंच काही शिकण्याची संधी मिळणार आहे हे नक्की.
Sharing big screen 1 st time with this tallented actress #prajactamali… pic.twitter.com/JgfEGhdkjV
— Subodh (@subodhbhave) October 8, 2017
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
त्यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल कोणतीच माहिती समोर आली नसली तरीही त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो पाहता येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. तेव्हा आता हा चित्रपट नेमका कसा असेल याविषयीच जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. सुबोधच्या चित्रपटांची यादी पाहता तो नेहमीच बहुविध भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. त्यामुळे त्याच्या अभिनयाचा कोणता पैलू पाहायला मिळणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा फोटो सध्या बराच चर्चेत असून, या दोन्ही कलाकारांना चाहत्यांतर्फे चित्रपटासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.