चित्रपटसृष्टीत आजही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय बच्चनचे नाव आघाडीवर आहे. विविध कार्यक्रमांपासून ते अगदी चित्रपटांपर्यंत ऐश्वर्याची प्रत्येक अदा पाहण्याजोगी असते. विश्वसुंदरी म्हणून नावाजलेली ही अभिनेत्री तितकीच चांगली आई आणि पत्नीसुद्धा आहे. याचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चननेच केला आहे. मात्र, केवळ सौदर्यं ही एकमेव गोष्ट ऐश्वर्याची ओळख आहे, असे नव्हे. तिच्यातील काही विशेष गुणांमुळे ती चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींपेक्षा नक्कीच वेगळी ठरते. त्याच गोष्टींचा अभिषेकने माध्यमांशी बोलताना खुलासा केला. यावेळी त्याने आणखी एक गोष्टही स्पष्ट केली ज्यामुळे तो काहीसा दुखावला गेला होता.

नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, “आई झाल्यानंतर ऐश्वर्याने कौटुंबिक जबाबदारीला प्राधान्य देत स्वत:चे करिअर काही वेळासाठी बाजूला सारले. सध्याही ती आराध्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करतेय. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती एक ‘सुपरमॉम’ आहे. पण, आराध्याच्या जन्मानंतर तिच्या स्थूल शराराविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, त्याविषयीच्या चर्चा झाल्या. तिच्याविषयी केल्या गेलेल्या त्या विचित्र प्रतिक्रियांमुळे मी फार दुखावलो होतो.”

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

अभिषेक याविषयी पुढे म्हणाला, ‘तिने कधीच याविषयी तक्रार केली नाही, नाराजी व्यक्त केली नाही. मुळात तिने कधीही या प्रतिक्रिया मनावर घेत दिवसाचा जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवला केला नाही. याउलट मी दुखावलो जात आहे, हे पाहून तिनेच मला धीर दिला होता.’ या मुलाखतीत ऐश्वर्याविषयीचे आपले मत त्याने उघडपणे मांडले. ती कधीही कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नाही, ज्या गोष्टीमुळे ती मला फार आवडते असेही त्याने स्पष्ट केले. ऐश्वर्या कधीही तिच्या कामांच्या वेळांविषयी, किंवा मग तिथे तिला दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी, सोयीसुविधांविषयी तक्रार करत नाही. मारुती, मर्सिडीज किंवा अमुक एक कारमधूनच मला जायचे आहे अशी कोणतीच तक्रार ती कधीच करत नाही. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाप्रती ती नेहमीच कृतज्ञ असते, असेही अभिषेकने सांगितले.