महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वकव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडून ( एनसीडब्ल्यू) पाठविण्यात आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी सलमान खानच्या वकिलांनी सोमवारी आयोगापुढे हजेरी लावली होती. मात्र, नोटीसला दिलेल्या उत्तरात सलमानने आपल्या वक्तव्याबद्दल कोणताही खेद किंवा माफी मागितली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या नोटीसनुसार सलमान खानला आज महिला आयोगासमोर हजर राहायचे होते. मात्र सलमान स्वत: उपस्थित न राहता वकिलांना पाठवले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी सांगितले की, सलमानने आज त्याच्या वकिलाला पाठवले होते. वकिलाद्वारे दिलेल्या उत्तरात सलमानला ‘बलात्कार पीडित’ वक्तव्याबाबत कोणताही खेद व्यक्त केलेला नाही. दरम्यान, राज्य महिला आयोगाकडूनही सलमान खान याला येत्या ७ जुलै रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
.. तेव्हा मला बलात्कारित महिलेप्रमाणे वाटायचे- सलमान खान 

काही दिवसांपूर्वी ‘सुलतान’ चित्रपटाविषयी बोलताना सलमानने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. शूटींगच्या त्या सहा तासांमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागत होती. जर एखादा पहेलवान मला उचलून जमिनीवर आदळतोय तर मलाही १२० किलो वजनाच्या पहेलवानाला उचलून आपटावे लागत होते. जवळपास दहा वेळा दहा विविध बाजूंनी एकाचा दृश्याचा अँगल घेतला जाई. माझ्यासाठी हे फार कठीण काम होते. जेव्हा मी शूटींग आटपून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचे. मला सरळ चालताच यायचे नाही, असे सलमानने म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली होती.