‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील गोगी म्हणजेच समय शाह दहावीच्या परीक्षेत ८२ टक्क्यांनी उत्तीर्ण झालाय. मालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यग्र वेळापत्रकातून अभ्यासासाठी थोडा अवधी मिळत असतानाही त्याने परीक्षेत उत्तम कामगिरी केली. समयचा निकाल पाहून त्याचे आईवडील खूपच आनंदी आहेत.
अभ्यासासाठी थोडाच वेळ मिळत असल्याने आपल्याला दहावीत चांगले गुण मिळतील की नाही याची भिती समयच्या मनात होती. ‘मी प्रामाणिकपणे सांगतो की मला फक्त ७० टक्के गुण मिळतील अशीच आशा होती. मात्र जेव्हा मला समजलं की मला ८२ टक्के मिळाले आहेत तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मला इतके चांगले गुण मिळाले आहेत यावर माझा आधी विश्वासच बसत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया समयने निकालानंतर दिली.
मालिकेच्या चित्रीकरणासाठी समयला दररोज सेटवर जावे लागत होते आणि परीक्षेसाठीही त्याला सुट्टी देण्यात आली नव्हती. त्यामुळे दहावीच्या परीक्षेदरम्यानही तो चित्रीकरणामध्येच व्यस्त होता. ‘परीक्षेदरम्यानही मला शूटिंग करावी लागत होती, त्यामुळे मी माझी अभ्यासाची पुस्तके सेटवर घेऊन जायचो. सेटवर जसा वेळ मिळायचा तसा मी अभ्यास करायचो. या मेहनतीचे फळ मिळाल्याचा मला आनंद आहे,’ असंही समय म्हणाला.
वाचा : Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत समय रोशन सिंग सोढी याच्या मुलाची म्हणजेच गोगीची भूमिका साकारत आहे. मालिकेत पंजाबी मुलाची भूमिका असल्याने नेहमीच पगडी घातलेल्या समयला बाहेर पगडीशिवाय ओळखणे खूप कठीण जाते. निकाल लागल्यानंतर कुटुंबीय मिठाई भरवतानाचा एक फोटोदेखील समयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.