‘तुम्हाला ब्रेन कॅन्सर आहे’, असं जेव्हा डॉक्टर एखाद्या वक्तीला सांगतात तेव्हा त्यांची मानसिक स्थिती काय असेल याचा सर्वांनाच अंदाज आहे. पण, ‘बापजन्म’मधील भास्कर पंडीत मात्र याला अपवाद ठरत आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या हाती जेव्हा हे सर्व रिपोर्ट स्थिरावतात तेव्हा ‘घरातलं कुणी सोबत आलंय का’, असं विचारल्यावर ते घरात काम करणाऱ्या ‘माऊली’ला मोठ्या हक्कानं बोलवतात. इथेच चित्रपटाच्या पुढच्या कथानकाचा अंदाज येतो.

‘बापजन्म’ या नावातून वडिलांच्या भूमिकेभोवती चित्रपटाचं कथानक फिरणार याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता. पण, या अंदाजात ‘सिक्रेट एजन्ट’ बाप नेमका कसा असतो, याचं दर्शन घडणार ही कल्पनाही अनेकांनी केली नसावी. ‘रॉ’मध्ये काम करणारा, कामामुळे आपल्या कुटुंबापासून दुरावलेला एक बाप उतारवयात मुलांच्या प्रेमाला मुकतो. पण, त्याचा लवलेशही तो इतरांना जाणवू देत नाही. कामामुळे स्वभावात आलेला रुक्षपणा आणि त्याच रुक्षपणामुळे दुरावलेली त्यांची मुलं याभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं.

परदेशात असलेला मुलगा आणि सासरी असणारी मुलगी आपल्याला भेटायलाच येत नाहीत. त्यातही जीवघेण्या आजारामुळे आता आपण काही दिवसच जगणार आहोत हे कळल्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या माणसांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यातही पत्नीचं निधन झाल्यामुळे अचानक आलेला एकटेपणा कधीकधी खायला येतो. यावरच मग उपाय म्हणून स्वत:च्या मरणाचं नाटक रचत, किंबहुना थेट सरणावरुन परत येत भास्कर पंडीत यांचा ‘सीसीटीव्ही’रुपी आत्मा, आत्मा नव्हे तर खरेखुरे भास्कर पंडीत या तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करत आपल्याच मुलांवर नजर ठेवतात.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी बऱ्याच वर्षांनी पंडितांची मुलगी आणि मुलगाही एकमेकांना भेटतात. वडीलांची महागडी दारु पितात, एकमेकांची सुखदु:ख वाटतात. या साऱ्याला वडिलांच्या मृत्यूचं निमित्तं असलं तरीही त्यांच्या जाण्याने मुलांना काहीच वाटत नसतं. कारण, स्वभावाप्रमाणे पंडितांच्या रुक्ष स्वभावाचा फटका या मुलांना बसलेला असतो. बालपणातच त्यांच्यापासून बाप दुरावलेला असतो. पण, यामागे भास्कर पंडित यांचाही काहीच दोष नसतो.

पालकांचा स्वभावच कधीकधी मुलं दुरावण्याला कारणीभूत असतो हे चित्रपट पाहताना हलकसं लक्षात येतं. पण, त्याच मुलांसोबत असूनही त्यांच्या सोबत नसणारे भास्कर पंडीत सर्वच बाबांना भावतील असं नाही. कारण, प्रत्येक बाबांकडे भास्कर पंडितांसारखा सहकारी, ‘रॉ’मध्ये काम केल्याचा अनुभव नसतो. त्यामुळे चित्रपटाशी संबंध जोडला तर त्यात आपल्या नात्यांचं प्रतिबिंब दिसतं, पण, हा संबंध जोडणं तसं कठीणच.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी ‘भास्कर पंडित’ या निवृत्त रॉ एजन्टची व्यक्तीरेखा सुरेखपणे साकारली आहे. त्यांच्या खोचक बोलण्यात आणि वाळवंटासारख्या रखरखीत आयुष्यात काही हलक्याफुलक्या क्षणांची उधळण करण्यासाठी सतत काहीतरी खटाटोप करणारा ‘माऊली’ म्हणजेच पुष्कराज चिरपु़टकर त्याच्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतोय. चित्रपटातील गाणी सुमधूर असून, ‘देवाने दिधली लोचने तुला पाहण्या….’ असं तुम्हीही गुणगुणाल यात वाद नाही. गंधार संगोराम याने त्याच्या हाती दिलेली जबाबदारी लिलया पेलली आहे. चित्रपटातील संवाद, प्रासंगिक विनोद आणि एका गंभीर मुद्द्याला निपुणने मनोरंजक स्वरुपात मांडण्यासा चांगला प्रयत्न केला आहे. पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीत खुलणारा चित्रपट हिमाचलपर्यंत जाऊन कसा थांबतो आणि कसा होतो ‘बापजन्म’ हे अनुभवण्यासाठी एकदा हा चित्रपट पाहण्यास काहीच हरकत नाही.

 

सायली पाटील
sayali.patil@loksatta.com

Story img Loader