करोनाचिंतेने सर्वाचे भावविश्व व्यापले आहे. भय, हुरहूर, चिंता पसरविणाऱ्या करोनाछायेतून बाहेर कसे पडावे, मन:स्वास्थ्य राखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, अशा अनेक मुद्यांबाबत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी शुक्रवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात मार्गदर्शन करणार आहेत. ‘करोनाकाळातील मनाचे स्वास्थ्य’ या विषयावर डॉ. नाडकर्णी हे वाचकांशी संवाद साधतील.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून भारतासह इतर देशातील नागरिकही आपापल्या घरांमध्येच आहेत. सतत करोनाविषयी ऐकून, वाचून आणि पाहून नागरिकांच्या मनात चिंता वाढली आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीला घरातून काम करण्याचा अनेकांचा उत्साहही आता मावळू लागला आहे. टाळेबंदीतून कधी मुक्तता मिळणार, याची चिंता वाटू लागली आहे. याचा परिणाम काहींच्या मनावर दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. अनेक जण शरीरापेक्षा मनाने अधिक पिचण्याची भीतीही सातत्याने व्यक्त होत आहे. त्यामुळे मनाच्या विविध समस्यांना कसे तोंड द्यावे, मनाचे आरोग्य आणि हुरूप कसा राखावा याचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. वाचकांना ते मिळावे यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेबसंवादात डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार असून, त्यात घरबसल्या सर्व शंकांचे निरसन करण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

कसे सहभागी व्हाल?

करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी- संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबच्या माध्यमातून म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबद्वारे होईल. त्यासाठी http://tiny.cc/Loksatta-Aarogyamaan-Bhav या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर एक संदेश येईल. या संदेशावर शुक्रवार, २४ एप्रिल रोजी वेबसंवादाच्या काही वेळ आधी क्लिक करून सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी  http://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

Story img Loader