पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे कायमच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. मोदींच्या भाषणासाठी अनिवासी भारतीयांनी केलेली गर्दी असो किंवा त्यांचा पेहराव अथवा त्यांनी वाजवलेले वाद्य असो. असे अनेक खमंग किस्से कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. मोदींच्या सध्या सुरू असलेल्या युरोप दौऱ्यातही असाच प्रकार घडला आहे. किंबहुना या गोष्टीची पुनरावृत्ती झाली आहे, असेच म्हणावे लागेल.
युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनीत दाखल झाले. यावेळी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारत- जर्मनी द्विपक्षीय संबंध आणि हवामान बदल या मुद्द्यांवर चर्चा झाली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मोदी यांनी मर्केल यांच्या दिशेने वळत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, ही गोष्टी मर्केल यांच्या लक्षात न आल्यामुळे त्या मोदींना हात न मिळवता त्यांना छायाचित्र काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर घेऊन गेल्या. या ठिकाणी मर्केल यांनी मोदींशी हस्तांदोलन केले खरे. मात्र, एखादी लहानशी गोष्टही नजरेतून न सुटणाऱ्या ‘अतिजागरूक’ सोशल मीडियाकरांच्या नजरेत मोदी आणि मर्केल यांचे चुकलेले टायमिंगच अधिक भरले. त्यानंतर सोशल मीडियावर साहजिकच या प्रकाराची चर्चा रंगली. या सगळ्या चर्चेदरम्यान आणखी एक रंजक गोष्ट पुढे आली. यापूर्वी २०१५ सालच्या मोदींच्या जर्मनी दौऱ्यातही असाच प्रकार घडला होता. त्यावेळीही अँजेला मर्केल अशाचप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्याशी हस्तांदोलन न करता पुढे गेल्या होत्या.
बर्लिनमध्ये नरेंद्र मोदी आणि देसी गर्लच्या भेटीचा सुंदर योग
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-जर्मनी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. या परिषदेला जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल याही उपस्थित होत्या. जर्मनी येथे आयोजित कऱण्यात आलेली ही चौथी परिषद होती. २०१७ च्या परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक, सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाया, विज्ञान तंत्रज्ञान, गुणात्मक विकास, शहरी पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य आणि पर्यायी औषधे, ऊर्जा यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटले होते. युरोपीय देशांमधील जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. याशिवाय परदेशी थेट गुंतवणुकीच्या बाबतीतही जर्मनीचा भारतामध्ये मोठा वाटा आहे. भारतात सध्या १६०० जर्मन कंपन्या असून, ६०० संयुक्तरित्या कार्यरत कंपन्या आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
VIDEO: भारतीय मते ‘पदरात’ पाडण्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नेसली साडी