बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरसुद्धा छान बाग करता येऊ शकते, यावर कुणाचा विश्वास नसे. म्हणूनच या जागेचा वापर फक्त घरातील अडगळीचे सामान ठेवण्यापुरताच होता. थोडक्यात, गच्चीचा वापर उन्हाळा सोडल्यास जवळपास बंदच असे. काळ बदलला, बंगल्याची आकर्षक डिझाइन्स आकार घेऊ लागली. अडगळीच्या सामानाची विल्हेवाट झाली आणि गच्चीवर फुलझाडांची कुंडी अवतरली.
गच्चीवरील बाग बंगल्यास जशी शोभून दिसते तशीच ती दुमजली घराससुद्धा. घरमालकाने जुन्या बंगल्याच्या जागी ३-४ मजली इमारत विकसित केली असेल तर तो वरचा मजला स्वत:कडे ठेऊन गच्चीची मालकीही मिळवतो. उद्देश घरगुती कार्यक्रमास हवी तशी जागा आणि सोबत मनास आनंद देणारी छोटीशी बाग.
गच्चीवरील बाग अजूनही मुंबईमधील काही बठय़ा बंगल्यांवर आढळते. मात्र तिचे खरे प्राबल्य उपनगरात विशेषत: कल्याण, विरार, वसईच्या पुढील शहरी भागात जास्त आढळते आणि त्यास मुख्य कारण म्हणजे तेथे विकसित झालेली टुमदार घरांची संस्कृती. पुणे आणि परिसरात अशा बागांची रेलचेल आहे.
गच्चीवरील बाग उद्यानशास्त्राच्या व्याख्येनुसार दोन प्रकारांत मोडते. बंगला अथवा स्वमालकीच्या २-३ मजली घराच्यावर केलेली कुंडय़ाची बाग आणि बहुमजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर तयार केलेले विस्तीर्ण उद्यान. यालाच ‘टेरेस गार्डन’ असेही म्हणतात. हा खíचक प्रकार असून त्यासाठी गच्चीवर विशिष्ट प्रकारचे खास आवरण टाकावे लागते. या उद्यानात मोठय़ा प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य असते. कुंडय़ाचा वापर फार कमी असतो. अनेक ठिकाणी अख्खी गच्ची यासाठी वापरली जाते आणि पाणीसुद्धा तुषार पद्धतीने दिले जाते. अशी भव्य-दिव्य प्रशस्त उद्याने आपणास दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेक इमारतींच्या गच्चीवर पाहावयास मिळतात. खाजगी मालकीच्या या बागांची निगराणी ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या हरित इमारत मोहिमेमध्ये ही संकल्पना अनेक उद्योग समूहांकडून सर्वत्रच उचलली जात आहे हे महत्त्वाचे. मध्यमवर्गीयांचे प्रेम असलेली गच्चीवरील बाग स्वमालकीच्या घरावर छान तयार करता येते. मात्र त्यासाठी गच्चीचा १/३ भागच वापरावा. कुंडय़ा आकाराने थोडय़ा मोठय़ा, एकसारख्या असाव्यात. गच्चीवर सूर्यप्रकाश आणि सावली हे दोन्हीही असण्याची शक्यता असते. म्हणून त्याप्रमाणे कुंडय़ांची निवड करावी. सुंगधी फुले देणाऱ्या जाई, जुई, चमेली मोठय़ा कुंडीत बांबूच्या विशिष्ट प्रकारच्या आधाराने छान वाढतात. वृक्ष कुळातील झाडे अथवा पाम लावू नयेत. गच्चीवर परसबाग अथवा कुंडीतील औषधी उद्यान सहज तयार करता येते. बगीच्यात पाणी देण्याची व्यवस्था वरच असावी. पाण्याचा वापर मर्यादित असावा. गच्चीच्या एका कोपऱ्यात वाळलेली पाने आणि घरातील ओला कचरा कुजविण्यासाठी छोटी बंदिस्त जागा असावी. गांडूळ खत करू नये. कारण त्यामुळे पक्ष्यांचा त्रास वाढतो. मात्र त्यांची तहान भागवण्यासाठी एक छोटी पाण्याची थाळी जरूर असावी. गच्चीच्या कटय़ावर कुंडय़ा ठेवू नयेत. घरगुती समारंभामध्ये गच्चीवरच्या बागेचा सहभाग असेल तर आनंद द्विगुणित होतो. गप्पागोष्टी, वाचन, चिंतन आणि दैनंदिन बठे व्यायाम यामध्ये या बागेचा ऊर्जास्रोत म्हणून महत्त्वाचा सहभाग आहे.
शहरातील हरवलेल्या वृक्षराजीमुळे गच्चीवरील बागेस अनेक छोटे पक्षी दररोज भेट देत असतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि फुलपाखरेसुद्धा! ही एक जैवविविधतेची शाळाच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. महानगरामधील शाळांची गच्ची विनाकारण वाया जाते. अशा गच्चीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असलेली झाडे कुंडीच्या रूपात लावली तर तेथे गच्चीवरील बागेच्या रूपात पर्यावरणशास्त्राची एक चालती-बोलती प्रयोगशाळा तयार होऊ शकते हे मी कल्याणमधील एका शाळेच्या गच्चीवर प्रत्यक्ष अनुभवले आहे. अशा अभ्यास बाग निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग जरूर असावा.
तुमची वास्तू जर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असू शकते तर तिच्या गच्चीवरील छोटी सुंदर बाग तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे वृक्षांवरील प्रेम आणि आपुलकी त्यांना
एकत्र गुंफण्याचे अनोखे बंधन का असू नये? आणि तसे असेल तर अशा वास्तूत राहण्याचा आनंद स्वर्गीय सुखापेक्षा वेगळा तो काय असणार!

How do forest fires start
जंगलात आग कशी लागते? त्याला जबाबदार कोण? ‘त्या’ थांबवायच्या कशा?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?