नाटय़ क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक श्री. एलकुंचवार यांना सोमवारी रंगभूमीदिनी सांगली नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री. एलकुंचवार यांनी यावेळी नाटय़ क्षेत्रातील प्रायोगिकता आणि परंपरा यावरून होणाऱ्या टीकेबद्दल लेखक म्हणून होणारी घुसमट कथन केली.
आपले स्वतचे नियम आणि व्याकरण निर्माण करून नाटक सिद्ध करणे म्हणजे प्रायोजिकता, परंतु ही सिद्धी आज किती नाटककारात निर्माण झाली आहे, हे तपासून पाहण्याची गरज आहे. बंडखोरी म्हणजे प्रायोजिकता हाही समज बदलण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.
विष्णुदास भावे गौरव पदकाची बालगंधर्व ते विजया मेता यांच्यापर्यंतची नामावली पाहून आपण हे पदक स्वीकारण्यास कितपत योग्य आहोत, असा प्रश्न पडला, असे नम्रपणे कबूल करीत महेश एलकुंचवार म्हणाले, या पदकाची प्रतिष्ठा मोठी आहे. नाटय़क्षेत्रात अपघाताने मी पडलो, शिकत गेलो, बऱ्याच गोष्टी चुकल्या. त्यातून बाहेर कसे पडायचे यासाठी चाचपडतो आहे. परंपरा म्हणजे काय, याचे उत्तर देणे अवघड आहे. नाटक म्हणजे एक मोठय़ा समाजाचा आविष्कार आहे. नाटक म्हणजे समूह मताचा आविष्कार आहे. खरं तर तेंडुलकरांच्या परंपरेतील नाटककार म्हणून माझी ओळख करून देण्यात आली. तेंडुलकरांची परंपरा ही मामा वरेरकरांपासून सुरू होते. घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, बेगम बर्वे ही खरं तर संगीत नाटकांच्या परंपरेतील नाटके. परंतु ही परंपरा इथेच थांबली. ‘तीन पशाचा तमाशा’ हे बाहेरून आणलेले नाटक, परंपरेचे बळ घेऊन आधुनिकतेचे मन जोपासण्याची गरज आहे. परंपरा म्हणजे मागे वळून पाहावे असे नाही. डोळसपणे वेगळेपण स्वीकारणे होय! बंडखोरी हेही ओघाने येतच असते बंडखोरी म्हणजे जिवंत समाजमनाचे लक्षणच असते, असे सांगून एलकुंचवार म्हणाले, ज्यांची मते बदलत नाहीत त्यांची वाढ खुंटते.
भावे नाटय़मंदिरात झालेल्या या समारंभात एलकुंचवार यांना भावेपदक प्रदान सोहळ्यास रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भावे नाटय़मंदिर समितीच्या कलाकारांनी नांदी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत, तर कार्यवाह अॅड. व्ही. जे. ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. स्थानिक कलावंत राजेंद्र पोळ आणि प्रा. नंदा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त महेश एलकुंचवार यांचा प्रा. वैजनाथ महाजन यांनी परिचय करून दिला. यावेळी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांचेही भाषण झाले. त्यानंतर महेश एलकुंचवार यांची प्रा. अविनाश सप्रे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा