अवघ्या काही आठवड्यांतच सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो टीआरपी यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. ज्ञानाच्या जोरावर रक्कम जिंकण्याची संधी हा शो स्पर्धकांना देतो आणि ‘केबीसी ९’ला नुकतीच त्यांची पहिली कोट्यधीश मिळाली आहे. जमशेदपूर येथून आलेली स्पर्धक अनामिका मजुमदारने शोमध्ये एक कोटीची रक्कम जिंकली आहे.

अनामिका उत्तम प्रकारे खेळत असताना सात कोटींच्या प्रश्नापर्यंतही पोहोचली होती. मात्र उत्तरासंदर्भात संभ्रम असल्याने एक कोटी रुपये घेऊन तिथेच खेळ सोडण्याचा निर्णय तिने घेतला. या सिझनची पहिली कोट्यधीश मिळाल्याने सर्वांकडूनच आनंद व्यक्त केला जात आहे.

वाचा : हृतिकने या व्यक्तींनाही दिला दगा

शोमध्ये एक कोटी रक्कम जिंकणाऱ्या अनामिकाचं लग्न झालं असून तिला दोन मुलं आहेत. ‘फेथ फॉर इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेसाठी ती काम करते. झारखंडमधील ग्रामीण परिसरातील सामाजिक कार्यासाठी ती या जिंकलेल्या रकमेचा वापर करणार आहे. यापूर्वी शोमध्ये बिरेश चौधरी हा स्पर्धक ५० लाख रुपये जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

VIDEO : ..अन् रणवीर सोनाक्षीला ‘शट अप’ म्हणाला!

यावेळी ‘नई चाह नई राह’ ही नवी संकल्पना या शोमध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात समाज किंवा देशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना बोलावले जाते. या भागात आतापर्यंत महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि तिची टीम आणि सुपर-३० चे संस्थापक आनंद कुमार अशा सन्मानित व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. लवकरच केबीसीमध्ये क्रीडा जगतातील आणखी एक व्यक्ती, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू सहभागी होणार असल्याची माहिती आहे.