एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही प्रशंसा मिळवली. या चित्रपटाने गेल्या वर्षी ६०० कोटी रुपयांची कमाई करीत विक्रम नोंदवला. चित्रपट पाहून आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न खदखदत होता, तो म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’ अनेकांनी त्यांचे तर्कवितर्क लावले. सोशल मिडियावर तर या प्रश्नाने धुमाकूळच घातला होता. चाहत्यांच्या मनात कित्येक दिवस घोंगावत ठेवलेल्या या प्रश्नामागचे रहस्य राजामौली यांनी कशाप्रकारे जपलं याचा त्यांनी खुलासा केला.

नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर ‘बाहुबली’च्या टीममधील किती लोकांना माहित होतं आणि ते रहस्य जपणं किती कठीण होतं असं राजामौली यांना नुकत्याच एका मुलाखतीत विचारलं गेलं. यावर ते म्हणाले की, ‘खरंतर, तो इतका कठीण प्रश्न नव्हता. तुम्ही जर एकाग्रतेने दोन वेळा तो चित्रपट पाहिला तर तुम्हाला उत्तर शोधून काढणं कठीण जात नाही. जेव्हा अनेकजण मला याबाबत ट्विट करत होते, त्यातील बहुतांश लोकांचा तर्क योग्य होता. कटप्पाने बाहुबलीला का मारले यापेक्षा मोठा प्रश्न होता की त्याने कसं मारलं? आणि याचा तर्क लावणं सहज शक्य नव्हतं.’

वाचा : झहीर खान एकटाच हनिमूनला गेलाय वाटतं; सानिया मिर्झाची मजेशीर प्रतिक्रिया

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करतानाही सेटवर कशाप्रकारे गुप्तता पाळण्यात आली हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं. ‘संपूर्ण टीमपैकी फक्त १० ते १५ जणांनाच चित्रपटाची कथा माहित होती. चित्रीकरणासाठी दोन वर्षांचा काळ गेला आणि मुख्य म्हणजे एका क्रमाने ते चित्रीकरण झालं नाही. कोणतंही दृश्य कोणत्याही दिवशी चित्रीत व्हायचं. एका दृश्यासाठी कित्येक रिटेक्स व्हायचे. कधी कधी आपण नेमके काय चित्रीत करतोय, हेच समजेनासं व्हायचं. दृश्यांचा क्रम लावणं टीमच्या सदस्यांसाठी सोपं काम नव्हतं. त्यामुळे आपोआपच ते रहस्य जपलं गेलं. खरंतर, त्यांना गुंतून ठेवण्याचा हेतू अजिबात नव्हता. पण चित्रपटाचं कामच तशा पद्धतीने चालतं. त्याला काही दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे युनिटमधल्या लोकांना ते उत्तर सहजरित्या समजू शकलं नाही,’ असं ते म्हणाले.

वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रभासला घातली भुरळ

यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातून अखेर त्या प्रश्नाचा उलगडा झाला.