संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट ‘पद्मावती’ प्रदर्शित होण्यापूर्वी विविध कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, कलाकारांचे लूक या सर्व गोष्टींसोबतच चित्रपट आणखी एका कारणामुळे प्रकाशझोतात आहे. ते कारण म्हणजे काही संघटनांकडून या चित्रपटाला होणारा विरोध. आता यामध्ये जय राजपूताना संघटनेची भर पडली आहे. या संघटनेने जयपूरमधील चित्रपटगृहांना या चित्रपटाचं स्क्रीनिंग न करण्याचे आदेश दिले आहेत.

राजपूत संघटनानांना दाखवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास चित्रपटगृहांमध्ये जाळपोळ करू, अशी धमकीही संघटनेने दिली आहे. ‘इतिहासाची अशी हेळसांड आम्ही खपवून घेणार नाही. त्यातही अलाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मावती यांच्यामध्ये कोणतंही नातं असल्याचं प्रतीत होणारी दृश्य चित्रपटात दाखवण्यात आली, तर आम्ही चित्रपटगृहात जाळपोळ करु’, असं जय राजपूताना संघटनेचे संस्थापक भंवर सिंह रेता यांनी स्पष्ट केलं. जवळपास अडीच लाख सदस्य संख्या असलेल्या या संघटनेचा होणारा विरोध पाहता आता भन्साळींच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं स्पष्ट होत आहे.

वाचा : अबब! ४०० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजली ‘पद्मावती’

‘पद्मावती’ या चित्रपटाचं कथानक काय असणार याची कुणकुण लागल्यापासूनच या चित्रपटाला विरोध करण्यात येत होता. चित्रीकरणाच्या सुरुवातीलाही करणी सेना या राजपूत संघटनेनेही या चित्रपटाला विरोध करत सेटवर तोडफोड केली होती. तेव्हा आता हे एकंदर वातावरण पाहता १ डिसेंबरला ‘पद्मावती’ कोणत्याही अडचणीशिवाय प्रदर्शित होणार का, हे पाहणं मह्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…