अभिनेता राणा डग्गुबती तेलगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. पण, ‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनने त्याला बॉलिवूडमध्येही स्थान मिळवून दिले. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांचीही संख्या बरीच वाढली आहे. आपल्या या चाहत्यांसाठी राणाने नववर्षाची खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक नववर्षाच्या औचित्याने प्रदर्शित करण्यात आला.

TOP 10 NEWS वाचा : विरुष्कापासून आलिया-सिद्धार्थपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

राणाचा ‘हाथी मेरे साथी’ सत्य घटनांवर आधारित असून, या चित्रपटाची प्रेरणा राजेश खन्ना यांच्या १९७१ साली आलेल्या चित्रपटातून घेण्यात आली आहे. डग्गुबती साकारत असलेली ‘बनदेव’ची भूमिका ही बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारला श्रद्धांजली असणार आहे. तमिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

वाचा : या कारणांमुळे किंग खानचे स्मोकिंग कमी झाले

डग्गुबतीने त्याच्या ट्विटर अकाऊंवटर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. हत्तीच्या पुढे उभा असलेला राणा यात तडफदार लूकमध्य दिसतो. तमिळ दिग्दर्शक प्रबू सोलोमोन्स ‘हाथी मेरे साथी’ने हिंदीत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी चित्रपटात वीएफएक्सची पुरेपूर मेजवानी असणार आहे. जानेवारी महिन्यात थायलंडमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. यंदा दिवाळीच्या दरम्यान ‘हाथी मेरे साथी’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.