अर्जुन रामपाल खूप दिवसांनी सिनेमामध्ये दिसणार आहे. आता एवढ्या दिवसांनी त्याचा सिनेमा येणार म्हटल्यावर त्या सिनेमाची कथाही तशी दमदारच हवी ना… मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेल्या डॅडी या सिनेमातून अर्जुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी रात्री या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये कुख्यात गुंड ते एक राजकारणी असा गवळीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात वयानुसार गवळीमध्ये होणारे बदलही उत्तमरित्या दाखवण्यात आले आहेत. जसे तरुण वयात असताना अरुणचे केस लांब होते तर राजकारणी झाल्यावर केस छोटे ठेवण्यात आले. अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ बनण्यापर्यंतचा प्रवास इतकाही सोपा नव्हता हे या सिनेमाचा ट्रेलर पाहताना लक्षात येते. ‘डॅडी’ या सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल.

कथा पडद्यामागचीः नाटक करणं ही माझी गरज- पुष्कर श्रोत्री

अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित याआधीही अनेक सिनेमे येऊन गेलेत. पण, अर्जुनच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अधीक अपेक्षा आहेत. सिनेमाची कथा दगडी चाळपासून सुरू होते. १९७० च्या दशकात मिल बंद झाल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले होते. यातून अनेकांनी अंडरवर्ल्डचा मार्ग पत्करला. यातून बाबू, रामा आणि अरुण यांनी त्यांची बी.आर.ए गॅग सुरू केली.

या सिनेमात अनेक मराठी कलाकारांचे चेहरेही दिसत आहेत. आनंद इंगळे याने बाबूची भूमिका साकारली आहे तर राजेश श्रृंगारपुरे याने रामाची व्यक्तिरेखा वठवली आहे. निशिकांत कामत याने पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. व्यक्तिरेखेच्या जवळ जाण्यासाठी अर्जुनने अरुण गवळीची भेटही घेतली होती. आजही अरुण गवळीच्या नावाची दहशत काही प्रमाणात कायम आहे, असे म्हटले जाते. पण, अर्जुनने अनुभवलेला अरुण गवळी शांत आणि मितभाषी होता, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले.

Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी

गुंडगिरी आणि राजकारण यावर डॅडी हा सिनेमा आधारलेला आहे. दिग्दर्शक अशीम अहलुवालिया यानेच या सिनेमाचे सह-लेखनही केले आहे.  २१ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून गवळीच्या बायोकोची भूमिका ऐश्वर्या राजेश हिने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. अरुण गवळीचा तारुण्यातला फोटो आणि अर्जुनचा फोटो यात फार साम्य दिसत होतं.