चाहत्यांचा आपल्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद जाणून घ्यायला कोणत्या कलाकाराला आवडणार नाही. अखेर प्रेक्षकच तर प्रत्येक कलाकाराचे मायबाप असतात. त्यांच्यामुळेच एक कलाकार सुपरस्टार होतो. पण मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत मात्र यात एक पाऊल पुढे आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी ही ग्लॅम डॉल बुरखा घालून चित्रपटगृहात प्रेक्षकांसोबत बसते. याविषयीचा खुलासा खुद्द अभिनेता वैभव तत्ववादी याने ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’वेळी केला.

वाचा : ‘घराणेशाहीत वावगं काय?’

या महिन्यात पूजाचे लागोपाठ तीन चित्रपट आले. त्यातील ‘बसस्टॉप’ आणि ‘लपाछपी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून, ‘भेटली तू पुन्हा’ या आठवड्यात प्रदर्शित होईल. दरम्यान, ‘लपाछपी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रतिसाद याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पूजा तिच्या घरच्यांसह एका चित्रपटगृहात गेली होती. फॅन्ससोबतचा तुमचा अनुभव कसा आहे? असा प्रश्न दोघांना विचारण्यात आला होता. त्यावेळी स्वतःचा अनुभव सांगतानाच, ‘चित्रपटगृहात तुम्हाला बुरख्यात जर एखादी बाई दिसली तर ती पूजा सावंत’, असे वैभव पटकन बोलून गेला. त्यामुळे पूजाचं गुपित सर्वांसमोर उघड झालं. यावर पूजा म्हणाली की, मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतात. पण मी तेव्हा माझ्या कुटुंबासोबतच जाते. मी चित्रपटगृहात कधीच एकटी जात नाही. पुढे हसत पूजाने सर्व चाहत्यांना सल्ला देत चुकूनही बुरखा वर करून बघू नका. माझ्याऐवजी दुसरी व्यक्तीही तेथे असू शकते, असे म्हटले.

वाचा : ‘करण पैसे कमवतो, पण वर्षभर आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो’

वैभव आणि पूजाने वाचकांच्या सर्व प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. दरम्यान, चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारणारी पूजा रिअल लाइफमध्ये कशी आहे? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पूजाने ती शांत स्वभावाची आणि अगदी कमी लोकांसोबत खोडकरपणे वागणारी असल्याचे सांगितले. तसेच, ती वैभव आणि भूषण प्रधान यांच्यासमोर केव्हाही रडू शकते किंवा तिच्या भावना व्यक्त करू शकते असेही सांगितले. तर, पूजाही सर्वांची काळजी घेणारी आणि विचारपूस करणारी असल्यामुळे आम्ही तिला ‘युनिव्हर्सल आई’ म्हणतो, असे वैभवने सांगितले. यावेळी वैभवने पूजाच्या अनेक गुपितांचा खुलासा केला.