आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेता ऋषी कपूर यांनी नुकतीच नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडच्या तरुण पिढीवर घणाघाती टीका केली आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाला आताच्या पिढीतील बरीचशी कलाकार मंडळी उपस्थित नव्हती. यावर ऋषी कपूर यांनी त्यावेळी काही ट्विट करून राग व्यक्त केला होता. शोमध्ये नेहाने हा विषय पुन्हा काढला असताना ते तरुण कलाकारांवर भडकले.

ते म्हणाले की, ‘तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जा किंवा जाऊ नका, पण त्यांच्या संघर्षाच्या काळात तुम्ही नक्की त्यांची भेट घेतली पाहिजे. विनोद खन्ना यांच्या अंत्ययात्रेला फार कमी कलाकार उपस्थित होते. ते या इंडस्ट्रीचे आधारस्तंभ होते. पण कित्येक दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक किंवा अभिनेते त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते.’

वाचा : श्रद्धा कपूर आणि ‘हसीना पारकर’च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

‘फॅशनला जास्त महत्त्व देणारी आजची पिढी एखाद्याच्या निधनानंतर श्रद्धांजली देण्यासाठी चौथ्या दिवशी पोहोचतात. त्यांच्यासाठी हेसुद्धा पांढरे कपडे आणि गॉगल घालून येण्यासाठी एक निमित्त असतं. एअरपोर्टवरील लूकप्रमाणेच या विधीसाठीही त्यांचा लूक निश्चित झालेला असतो,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी तरुण कलाकारांवर शाब्दिक हल्ला चढवला. त्याचप्रमाणे ‘एअरपोर्ट लूक’च्या ट्रेंडवरही त्यांनी या शोमध्ये प्रतिक्रिया दिली. ‘एअरपोर्टवर रात्रीच्या वेळीसुद्धा आताचे कलाकार गडद रंगाचे गॉगल घालून येतात. वैयक्तिक आयुष्य सोडून सार्वजनिक ठिकाणी आपण कसं दिसावं हेच या निर्लज्ज कलाकारांसाठी महत्त्वाचं आहे,’ अशी सडकून टीका त्यांनी केली.

वाचा : कंगनावरील टीकेनंतर शेखर सुमन ट्रोल 

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेला कलाकारांच्या अनुपस्थितीमुळे ऋषी कपूर यांचा राग अनावर झाला होता. ‘मी जर वारलो तर मलाही कोणीच खांदा देण्यासाठी येणार नाही. यासाठी मी आतापासून मानसिक तयारी करायला हवी. स्वतःला स्टार म्हणवणाऱ्या या कलाकारांचा मला संताप येतोय,’ असं ट्विट त्यांनी केलं होतं.