ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही तुम्हाला एकही सामना जिंकू देणार नाही, हे फक्त त्यांनी बोलून दाखवले नाही, तर सत्यातही उतरवून दाखवले. कागदावर, फॉर्म, चाहत्यांच्या पसंतीमध्ये तुम्ही शेर असालही, पण मैदानात उतरल्यावर ‘आमच्यासारखेच आम्हीच’ असतो याचा प्रत्यय जिद्दी, विजिगीषु ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत अप्रतिम खेळाचा नजराणा पेश करीत दाखवून दिले. भारताचा विजयरथ अखेर यजमान ऑस्ट्रेलियाने रोखला. एकामागून एक विजय मिळवत मुख्य फेरीत जायचे आणि ऐन वेळी कच खायची, हे भारतीय संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले. सलग सात विजय मिळवणाऱ्या भारताला विश्वचषकाचे संभाव्य दावेदार म्हटले जात होते, पण ऑस्ट्रेलियाने त्यांच्याच आव्हानातली हवाच काढली. भारतीय चाहत्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी विश्वविजयाचे स्वप्न पुसून गेले आणि भारतीय संघाची ‘घरवापसी’ झाली. स्टीव्हन स्मिथचे नेत्रदीपक शतक आणि त्याला अन्य फलंदाजांच्या मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३२८ धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर सर करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला २३३ धावांमध्ये धाप लागली आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर ९५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
ही तो बाजारपेठेची इच्छा!
विधिमंडळातही क्रिकेटज्वर..
रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी पडणार आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आलेल्या ४५ हजार क्रिकेटरसिकांच्या साक्षीने ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पाटा खेळपट्टीवर आपसूकच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरला झटपट गमावले खरे, पण त्यानंतर मात्र मैदानात स्मिथची जादू पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवर धाव घेत त्याने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. एका बाजूने आरोन फिंच (८१) नांगरधारी फलंदाजाची भूमिका बजावत होता. स्मिथची शतकी खेळी ही नजरेची पारणे फेडणारी होती. नजाकतभऱ्या फटक्यांचा नजराणा पेश करीत त्याने धावगती वाढवली आणि ऑस्ट्रेलियाला द्विशतकाच्या उंबरठय़ावर उभे केले. ३३व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फाइन लेगला चौकार लगावत शतक पूर्ण केले. पण शतकानंतर जास्त काळ स्मिथला फलंदाजी करता आली नाही. स्मिथने ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९३ चेंडूंत १०५ धावा फटकावल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा होती खरी, पण त्याने अपेक्षाभंगच केला. भारताने सामन्यावर पकड मजबूत केली होती. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मिचेल जॉन्सनने फक्त ९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद २७ धावांची खेळी साकारत संघाला सव्वातीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक चार बळी घेतले, परंतु त्यासाठी त्याला ७२ धावा मोजाव्या लागल्या.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने संयतपणे ७६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर ३२ धावांमध्ये चार फलंदाज गमावले आणि भारतीय संघ पराभवाच्या खाईत ढकलला गेला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ६५ धावांची खेळी साकारत संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. ग्लेन मॅक्सवेलने त्याला अप्रतिमपणे धावचीत केले आणि भारताने शस्त्रे टाकत परतीचे तिकीट निश्चित केले.
घरवापसी!
अंदाज फसले
फसलेली रणनीती
भारताचा ‘पंच’नामा!
सांत्वनाचा शब्दच्छल
अभी इतना बुढा नहीं हुआ हूं!
 ..अनुष्काला बघताच पडली माझी विकेट!
पराभवानंतरही समाजमाध्यमांतून भारतीय संघाला पाठिंबा
शतकापेक्षा संघाच्या विजयात योगदान देता आल्याचा आनंद आणि समाधान जास्त आहे. ३२८ पुरेशी धावसंख्या होती, मात्र या धावसंख्येचा बचाव करण्याकरिता आम्हाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण साजेसे करणे आवश्यक होते. आम्ही तेच केले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणे अतिशय सुखावणारी गोष्ट आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करणाऱ्या प्रत्येकाचा या खेळीत वाटा आहे. रहाणेच्या बॅटला चेंडू लागला याबद्दल मी ठाम होतो. म्हणूनच कर्णधाराला पंचांकडे दाद मागण्यास सांगितले आणि निर्णय आमच्या बाजूनेच लागला. विश्वचषकाची अंतिम लढत खेळायला मिळणे हा मोठा सन्मान आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. त्या लढतीतही मोठी खेळी करण्याचा निर्धार आहे.
-स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

धावफलक
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच झे. धवन गो. यादव ८१, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. यादव १२, स्टीव्हन स्मिथ झे. रोहित शर्मा गो. यादव १०५, ग्लेन मॅक्सवेल झे. रहाणे गो. अश्विन २३, शेन वॉटसन झे. रहाणे गो. मोहित शर्मा २८, मायकेल क्लार्क झे. रोहित शर्मा गो. मोहित शर्मा १०, जेम्स फॉकनर त्रि. गो. यादव २१, ब्रॅड हॅडिन नाबाद ७, मिचेल जॉन्सन नाबाद २७, अवांतर (बाइज १, लेग बाइज ७, वाइड ६) १४, एकूण ५० षटकांत ७ बाद ३२८.
बाद क्रम : १-१५, २-१९७, ३-२३२, ४-२३३, ५-२४८, ६-२८४, ७-२९८.
गोलंदाजी : मोहम्मद शमी १०-०-६८-०, उमेश यादव ९-०-७२-४, मोहित शर्मा १०-०-७५-२,
विराट कोहली १-०-७-०, रवींद्र जडेजा १०-०-५६-०, आर. अश्विन १०-०-४२-१.
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. जॉन्सन ३४, शिखर धवन झे. मॅक्सवेल गो. हॅझेलवूड ४५, विराट कोहली झे. हॅडिन गो जॉन्सन १, अजिंक्य रहाणे झे. हॅडिन गो. स्टार्क ४४, सुरेश रैना झे. हॅडिन गो. फॉकनर ७, महेंद्रसिंग धोनी धावचीत मॅक्सवेल ६५, रवींद्र जडेजा धावचीत स्मिथ १६, आर. अश्विन त्रि. गो फॉकनर ५, मोहम्मद शमी नाबाद १, मोहित शर्मा त्रि. गो. फॉकनर ०, उमेश यादव त्रि. गो. फॉकनर ०, अवांतर (लेग बाइज ८, वाइड ५, नो बॉल २) १५, एकूण ४६.५ षटकांत सर्व बाद २३३.
बाद क्रम : १-७६, २-७८, ३-९१, ४-१०८, ५-१७८, ६-२०८, ७-२३१, ८-२३२, ९-२३२, १०-२३३.
गोलंदाज : मिचेल स्टार्क ८.५-०-२८-२, जोश हॅझेलवूड १०-१-४१-१, मिचेल जॉन्सन १०-०-५०-२,
जेम्स फॉकनर ९-१-५९-३, ग्लेन मॅक्सवेल ५-०-१८-०,
शेन वॉटसन ४-०-२९-०.
सामनावीर : स्टिव्हन स्मिथ.

संपूर्ण संघाने शानदार खेळ केला. स्टीव्हन स्मिथच्या फटक्यांची निवड कलात्मक होती. ज्या पद्धतीने आमच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी ती स्पृहणीय होती. सर्वच खेळाडूंनी संघासाठी स्वत:ला झोकून दिले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गेले चार महिने ऑस्ट्रेलियात आहे. त्यांनी सातत्याने दिमाखदार खेळ केला आहे. साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आम्हाला नव्याने प्रेरणा मिळाली. त्या पराभवानंतर आम्ही आमच्या खेळावर आणखी मेहनत घेतली. आणि ही मेहनत निकालांमध्ये परावर्तित झाली आहे. पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारल्याचा अभिमान आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्धचा सामना रोमांचकारी असेल. मानसिकदृष्टय़ा अंतिम लढतीसाठी आम्ही तयार आहोत.
-मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सलग दुसऱ्यांदा यजमान अंतिम फेरीत
यजमान विश्वचषक जिंकत नाही, अशी गैरसमजूत काही वर्षांपूर्वी क्रिकेट जगतामध्ये होती. पण सलग दुसऱ्यांदा दोन्ही यजमान संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. गेल्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका हे दोन यजमान संघ अंतिम फेरीत होते, तर या वेळी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

आशियाई संघाविना अंतिम फेरी
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभवाला सामोरे जावे लागल्याने १९८७मध्ये अंतिम फेरीत एकही आशियाई संघ पोहोचला नव्हता. त्यानंतर पहिल्यांदाच विश्वचषक बिगरआशियाई देशांमध्ये जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे.  १९९२ ते २०११ या विश्वचषकांमध्ये भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यापैकी एका संघाने अंतिम फेरी गाठली होती. पाकिस्तानने १९९२मध्ये तर श्रीलंकेने १९९६मध्ये जेतेपद पटकावले. २०११ साली भारतीय संघाने २८ वर्षांनंतर जेतेपदाची कमाई केली.

३२८ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ. विशेष म्हणजे एकाही संघाला विश्वचषकाच्या बाद फेरीत तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करता आलेला नाही़

१० स्टीव्हन स्मिथने दहा वेळा एकदिवसीय लढतीत पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत आणि त्या दहाही लढतींत ऑस्ट्रेलियाने विजय साजरा केला. गुरुवारी स्मिथने एकदिवसीय कारकीर्दीतील चौथे शतक झळकावले.

विश्वचषकाच्या बाद फेरीच्या लढतीत चार बळी घेणारा उमेश यादव हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांत चार बळी घेण्याची किमया साधली आहे.
९५ विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने ९५ धावांनी विजय साजरा केला़  विश्वचषक इतिहासात उपांत्य फेरीतील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी २००३मध्ये भारताने ९१ धावा राखून केनियाचा पराभव केला होता़

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका)  ५४१ धावा
२. मार्टिन गप्तिल (न्यूझीलंड)  ५३२ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४८२ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) २१ बळी
२. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) २० बळी
३. उमेश यादव (भारत) १८ बळी